अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने बालविवाहावर अधिकृतपणे बंदी घातली आहे. राज्यपाल गॅव्हिन न्यूसम यांनी संबंधित विधेयकावर स्वाक्षरी केली असून, १ जानेवारी २०२७ पासून कॅलिफोर्नियात लग्नासाठी किमान वय १८ वर्षे असेल. यापूर्वी पालकांची संमती आणि न्यायालयाची मंजुरी असल्यास अल्पवयीन व्यक्तीलाही लग्न करता येत होते. कॅलिफोर्निया हे २०१८ पासून बालविवाहावर पूर्णपणे बंदी घालणारे अमेरिकेतील १८ वे राज्य ठरले आहे. मात्र अजूनही अमेरिकेतील ३२ राज्यांमध्ये काही परिस्थितींमध्ये अल्पवयीन व्यक्तींच्या विवाहाला कायदेशीर परवानगी आहे. याबद्दल सविस्तर वृत्त बीबीसीने दिले आहे.

न्यायालयाच्या मंजुरीसह अल्पवयीन मुलांचं लग्न

नव्या कायद्यापूर्वी कॅलिफोर्नियामध्ये अल्पवयीन व्यक्तीच्या लग्नासाठी पालकांची संमती आणि न्यायाधीशाची मंजुरी पुरेशी ठरू शकत होती. नव्या कायद्यामुळे ही तरतूद रद्द करण्यात आली आहे. आता विवाह आणि ‘डोमेस्टिक पार्टनरशिप’ या दोन्हीसाठी किमान वय १८ वर्षे असेल. बालविवाहाच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणचे आहे की, अशा विवाहांमध्ये अल्पवयीन मुलांना जबरदस्ती, शोषण किंवा हिंसक संबंधांमधून बाहेर पडताना अडचणी येऊ शकतात.

१६ व्या वर्षी ५० वर्षीय अभिनेत्याशी लग्न

या कायद्यावर स्वाक्षरी करताना न्यूसम यांच्यासोबत कोर्टनी स्टोडन देखील उपस्थित होत्या. स्टॉडन यांचे वय १६ वर्षे असताना त्यांच्या पालकांनी त्यांचा विवाह ५० वर्षीय अभिनेता डग हुचिसन यांच्याबरोबर करण्यास परवानगी दिली होती. या वैयक्तिक अनुभवानंतरच त्यांनी बालविवाहाविरोधात अभियान सुरू केले.

कायद्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर स्टॉडन यांनी बालविवाहातून वाचलेल्या व्यक्तींना अशा परिस्थितीचे ओझे आयुष्यभर वाहावे लागू नये, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमेरिकेतील सर्व ५० राज्यांमध्ये बालविवाहावर बंदी होईपर्यंत अभियान सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं.

‘मी एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात गेले’

बालविवाहातून वाचलेल्या ब्रिटनी बी यांनी ‘बीबीसी’शी बोलताना सांगितलं की, वयाच्या १७ व्या वर्षी घरातील कथित अत्याचारापासून वाचण्यासाठी त्यांचा विवाह झाला. मात्र त्यानंतरही पतीकडून कथित अत्याचाराला सामोरं जावं लागलं. त्यांनी बालविवाहाबाबत मुलांची संमती हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगत, लहान मुलांना अशा निर्णयासाठी जबाबदार धरता येत नाही, अशी भूमिका मांडली.

१५ व्या वर्षी जबरदस्तीने लग्न

सारा तस्नीम यांनीही बालविवाहाविरोधात अनेक वर्षे अभियान चालवलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या १५ व्या वर्षी त्यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या पुरुषासोबत त्यांचा विवाह करण्यात आला. लग्नाच्या दिवशीच त्यांची पतीशी ओळख करून देण्यात आली होती, असा त्यांचा दावा आहे. विवाहानंतर त्या वयाच्या १६ व्या वर्षी आई झाल्या आणि त्यांना शिक्षण सोडावं लागलं. कॅलिफोर्नियातील नव्या कायद्यामुळे पुढील पिढीतील मुलींना अशा परिस्थितीपासून संरक्षण मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये काय स्थिती?

कॅलिफोर्नियाच्या नव्या कायद्यामुळे आता अमेरिकेतील १८ राज्यांनी बालविवाहावर पूर्ण बंदी घातली आहे. मात्र ३२ राज्यांमध्ये अजूनही काही कायदेशीर अपवादांद्वारे अल्पवयीन विवाहाला परवानगी आहे. त्यामुळे अमेरिकेत बालविवाहाचा मुद्दा अद्याप पूर्णपणे संपलेला नाही.

कॅलिफोर्नियाचा नवा कायदा १ जानेवारी २०२७ पासून लागू होणार असून, त्यानंतर राज्यात १८ वर्षांखालील व्यक्तीला विवाह करण्याची परवानगी राहणार नाही.