California Stalker Shooting Shalini Thakur: कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो येथे मंगळवारी एका ३८ वर्षीय शालिनी ठाकूर या भारतीय वंशाच्या महिलेचा पाठलाग करून तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून एक २२ वर्षीय तरुण तिचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ करत होता. त्यानंतर, पोलिसांनी एका गजबजलेल्या महामार्गावर गाडी अडवल्यानंतर या आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सॅक्रामेंटो काउंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीडित शालिनी ठाकूर हिला सॅक्रामेंटोच्या आर्डेन आर्केड परिसरातील एका शॉपिंग प्लाझामध्ये तिच्या कामाच्या ठिकाणी सोडण्यात येत होतं, तेव्हा रोहित नावाच्या आरोपीने तिच्याजवळ जाऊन तिला हटकलं. अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, रोहित हा एक बेकायदेशीर स्थलांतरित होता. त्याला यापूर्वी ॲरिझोनामध्ये ताब्यातही घेण्यात आलं होतं. शालिनीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु रोहितने तिचा पाठलाग केला आणि भर रस्त्यात तिच्यावर लागोपाठ गोळ्या झाडल्या. ती खाली पडल्यानंतर त्याने अगदी जवळून तिच्या डोक्यात आणखी एक गोळी झाडली. वैद्यकीय पथकाने तिला घटनास्थळीच मृत घोषित केलं.

संशयिताने स्वतःवर झाडली गोळी

प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना संशयिताच्या कारचं वर्णन दिलं होतं, जे सॅक्रामेंटो काउंटी शेरीफ ऑफिसच्या ‘ऑटोमेटेड लायसन्स प्लेट रीडर’ सिस्टममध्ये टाकण्यात आलं. लेफ्टनंट अमर गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळातच त्या वाहनाचे शेवटचं ठिकाण समजलं. काही मिनिटांतच ती कार ईस्टबाउंड हायवे ५० वर आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, रोहितने अचानक ब्रेक दाबून गाडी हायवेवरच थांबवली. या पोलीस कारवाईमुळे कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलने ईस्टबाउंड कडील सर्व मार्ग बंद केले.

‘केसीआरए चॅनेल ३’ च्या फुटेजमध्ये संशयिताची कार शेरीफच्या वाहनांनी आणि एका लढाऊ वाहनाने वेढलेली दिसली, तर पोलीस बंदुका रोखून उभे होते. अखेर पोलिसांनी ड्रायव्हरच्या बाजूची काच फोडली आणि कारजवळ जाण्यापूर्वी आत एक ड्रोन पाठवला. संशयित आरोपी ड्रायव्हरच्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, त्याच्या शरीरावर स्वतःवर झाडलेल्या गोळीची जखम दिसत होती.

पोलिसांनी नंतर दुजोरा दिला की रोहितचा त्याच जखमेमुळे मृत्यू झाला. पोलिसांनी कोणताही गोळीबार केला नसल्याचं वृत्त ‘केसीआरए’ने दिलं आहे. ‘द सॅक्रामेंटो बी’ नुसार, न्यायालयीन कागदपत्रांवरून स्पष्ट होतं की, हा छळ सप्टेंबर २०२५ च्या सुमारास सुरू झाला आणि हळूहळू तो अत्यंत गंभीर व धोकादायक बनला. शालिनी तिच्या कामाच्या ठिकाणी डोअरडॅश पिकअपच्या माध्यमातून रोहितला ओळखत होती. रोहित तिच्या घराबाहेर तासन्तास थांबायचा, तिच्या कारचे टायर पंक्चर करायचा आणि तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कारच्या खाली ‘Apple AirTag’ लावला होता.

या प्रतिबंधात्मक आदेशाच्या कागदपत्रांनुसार, रोहित शालिनीवर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि तिने कोणाशी बोलावे यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता. एका प्रसंगी, त्याने तिच्या फ्लॅटच्या चावीची नक्कल बनवून ती झोपलेली असताना घरात प्रवेश केला होता. शेरीफच्या अधिकार्‍यांनी रोहितच्या या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि ठाकूर यांना प्रतिबंधात्मक आदेश मिळवण्यास सांगितलं होतं.