Trump Iran Nuclear Threat & JD Vance Warning: ‘इराणची संपूर्ण संस्कृती आज रात्री नष्ट होईल’, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवरील पोस्टमधून दिल्यानंतर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. इराणला दिलेली ४८ तासांची मुदत संपुष्टात येत असून इराणने जर माघार घेत करार केला नाही तर त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे ट्रम्प यांनी ताज्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्हटले की, आमच्याकडे अशी साधने आहेत जी आम्ही अजून वापरलेली नाहीत. या दोघांच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ जगभरातील माध्यमे आता काढत आहेत.

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडिया साईटवर लिहिलेल्या पोस्टमधील मजकूर आधी पाहू. त्यांनी लिहिले, “आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. जी पुन्हा परत कधीही आणता येणार नाही. असे व्हावे, अशी माझी बिलकुल इच्छा नाही. पण कदाचित ते होईलच.”

“तथापि, आता पूर्ण सत्तापालट होणार आहे. जिथे वेगळ्या प्रकारचे, हुशार आणि कमी कट्टरतावादी विचारांच्या लोकांचे वर्चस्व असेल. सध्या ठाऊक नाही, पण ते कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भुत असे घडवू शकतील. जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील आजच्या सर्वात महत्त्वाच्या रात्रीच ते कळू शकेल. ४७ वर्षांची लूटमार, भ्रष्टाचार आणि मृत्यूचे तांडव अखेर संपुष्टात येईल”, असेही ट्रम्प पुढे म्हणाले आहेत.

‘इराणच्या महान लोकांवर देवाचा आशीर्वाद असो’, असेही वाक्य या पोस्टच्या शेवटी ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावरून ट्रम्प नेमके काय सूचित करू इच्छितात, याचा मात्र अंदाज नाही.

उपाध्यक्ष व्हान्स यांचे विधान काय?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या संस्कृतीचा विनाश करण्याची पोस्ट केल्यानंतर काही वेळेतच उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचेही खळबळजनक विधान समोर आले. इराणला इशारा देताना व्हान्स म्हणाले की, अमेरिकेने आपली बहुतेक लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत. आता काही तासांची वेळ उरली आहे. त्यांना (इराण) हे कळायला हवे की, आमच्याकडे अशी शस्त्रास्त्रे आहेत, ज्याचा वापर करण्याचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही.

whole civilization will die tonight by trump
ट्रुथ पोस्टवरून डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी.

व्हान्स पुढे म्हणाले की, ही शस्त्रास्त्रे वापरायचा निर्णय राष्ट्राध्यक्ष ट्रम्प घेऊ शकतात. जर इराणने आपली भूमिका बदलली नाही तर ती वापरायचा निर्णय ते घेऊ शकतात. सोमवारी सकाळी ट्रम्प यांनी म्हटले होते, “इराण एका रात्रीत उद्ध्वस्त केला जाऊ शकतो.” राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या पाठोपाठ आलेल्या विधानानंतर अमेरिका अण्वस्त्रांचा वापर करेल का? अशी भीती जगभरात निर्माण झाली आहे.

विश्लेषक आणि माध्यमे काय म्हणतात?

द गार्डियनने मंगळवारी दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे विद्यमान आणि माजी सल्लागार वर्तुळात अशी भीती वाढत आहे की, राष्ट्राध्यक्ष इराणवर अणुहल्ला करण्याचा विचार करू शकतात.

ब्रिटिश लेखक आणि पत्रकार ओवेन जोन्स यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प इराणविरोधात अण्वस्त्रे वापरण्याची स्पष्टपणे धमकी देत आहेत. ही आपत्ती टाळण्यासाठी त्यांना अध्यक्षपदावरून हटवले पाहिजे.

संयुक्त राष्ट्रांचे राजनयिक आणि पॅट्रिऑटिक व्हिजन असोसिएशनचे संयुक्त राष्ट्रांमधील दीर्घकाळ प्रतिनिधी असलेल्या मोहम्मद सफा यांनी काही दिवसांपूर्वी याच प्रकारचा गंभीर आरोप केला होता. “संयुक्त राष्ट्रे इराणमध्ये संभाव्य अण्वस्त्र वापराची तयारी करत असताना आपण याचे साक्षीदार होऊ इच्छित नाही”, असे सांगत सफा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

possible nuclear weapon use in iran un diplomat mohamad safa
 इराणवर अणुबॉम्ब टाकला जाणार? संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी मोहम्मद सफा यांचा गंभीर आरोप

व्हाईट हाऊसने अण्वस्त्राची शक्यता फेटाळली

दरम्यान व्हाईट हाऊसने मात्र उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या विधानानंतर सुरू झालेली अण्वस्त्राच्या वापराची चर्चा फेटाळून लावली. आमच्याकडे अशी शस्त्रास्त्रे आहेत, ज्याचा वापर करण्याचा निर्णय आम्ही अद्याप घेतलेला नाही, या विधानावर स्पष्टीकरण देताना व्हाईट हाऊसने म्हटले की, उपाध्यक्षांचा बोलण्याचा तसा अर्थ निघत नाही.

व्हाइट हाऊसच्या वतीने रॅपिड रिस्पॉन्स फोर्सने एका पोस्टला उत्तर देत असताना व्हान्स यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.