शिवसेना अपात्रता प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी महत्त्वपूर्ण युक्तिवाद सादर केला आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे भिन्न घटक आहेत, यावर त्यांनी वारंवार भर दिला. बंडखोरी झाली तेव्हा मूळ राजकीय पक्ष कोण होता, हे निश्चित करणे महत्त्वाचे आहे, असे कामत म्हणाले. पक्षाचे प्रमुख सचिव यांसारख्या अंतर्गत रचनेची शिंदे गटाने पायमल्ली केली असल्याचा आरोप कामत यांनी केला. तर कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निर्णयांवर आजही प्रश्न उपस्थित केले.
धनुष्यबाण आम्हाला द्या किंवा गोठवा-सिब्बल
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली. या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आव्हान दिले आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेली आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचा युक्तिवाद केला. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह एकतर आम्हाला द्या किंवा गोठवा ही मागणी त्यांनी केली आहे.
१९ जुलैनंतरचं उदाहरण देत काय म्हणाले कपिल सिब्बल?
जर तुम्ही असे म्हणत असाल की १९ जुलै नंतर त्यांना (शिंदे गटाला) इतका पाठिंबा मिळाला आहे, तर तुम्ही अप्रत्यक्षपणे पक्षांतरालाच प्रोत्साहन देत आहात. मी माननीय न्यायालयाला विनंती करतो की, ‘शिवसेना’ हे नाव ठाकरे यांच्याच मालकीचे आहे आणि शिंदे गटाला ते पक्षचिन्ह मिळू शकत नाही, असा निर्णय द्यावा. त्यांनी त्या चिन्हाचा वापर करणे ही काही न्याय्य हक्काची बाब नाही; तो त्या चिन्हाचा अनधिकृत वापर आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवले गेले पाहिजे. जर ते चिन्ह त्यांना मिळू शकत नसेल आणि आम्हालाही मिळू शकत नसेल, तर ते गोठवणे हाच एकमेव पर्याय उरतो असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.
देवदत्त कामत यांनी काय म्हटलं?
शिवसेना फुटीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने विधिमंडळातील फूट ही राजकीय फूट मानली आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेंच्या ताब्यात दिली. मात्र ही गोष्ट दहाव्या अनुसूचीनुसार अवैध असून विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील गोष्ट केली, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. अध्यक्षांचा त्यावेळचा निर्णय हा चुकीचा होता, आता न्यायालय त्यावर निकाल देऊ शकतो असा युक्तिवाद हा अॅड. देवदत्त कामत यांनी केला.
एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्ती बागचींचा प्रश्न
न्यायमूर्ती बागची यांनी थेट विचारले की, सर्वोच्च न्यायालय स्वतः विधानसभा अध्यक्षांची भूमिका स्वीकारून एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकते का? न्यायालय अध्यक्षांचा चुकीचा निर्णय रद्द करू शकते, याबाबत शंका नसली तरी त्यानंतर स्वतः अपात्रतेचा निर्णय देण्याचा अधिकार कितपत आहे, हा प्रश्न उपस्थित झाला. ज्यानंतर देवदत्त कामत यांनी आधीच्या न्यायालयीन निर्णयांचा संदर्भ देत, अपात्रतेची याचिका चुकीच्या पद्धतीने निकाली काढली गेल्याचे न्यायालयाने ठरवल्यास त्याचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर निश्चित परिणाम होईल, असे सांगितलं.
