Essential guide on LPG Gas Cylinder Shortage in India: पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची आयात विस्कळीत झाली आहे. यामुळे देशभरात स्वयंपाकाच्या गॅसचे संभाव्य संकट उभे राहिले असून याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलली असून सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत.
केंद्र सरकारसमोर अफवांना आळा घालणे, गॅस सिलिंडरची पॅनिक बुकिंग रोखणे, एलपीजी सिलिंडरची साठवणूक आणि काळाबाजाराला प्रतिबंध घालणे अशी आव्हाने आहेत.
बुधवारी (११ मार्च) केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांबरोबर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत वरील निर्देश देण्यात आले.
यापूर्वी ९ मार्च रोजी, केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ लागू केला होता. या माध्यमातून लाखो सामान्य ग्राहकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते. नैसर्गिक वायू (पुरवठा नियमन) आदेश, २०२६ अंतर्गत, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सांगितले की, घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एलपीजी, घरांसाठी पाईपद्वारे पुरविला जाणारा नैसर्गिक वायू (पीएनजी) आणि वाहनांसाठी वापरण्यात येणारे सीएनजी यांना इतर क्षेत्रापेक्षा अधिक महत्त्व दिले जाईल.
कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाद्वारे एलपीजीचे उत्पादन घेतले जाते. भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात काही प्रमाणात एलपीजीची निर्मिती होते. परंतु ६० टक्क्यांपेक्षा जास्त एलपीजी आयात केला जातो. भारतात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीचा मोठा वाटा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. सध्या युद्धामुळे येथील जलवाहतूक खंडित झाली आहे.
सोशल मीडियावर नजर
गॅस व इंधन पुरवठ्याच्या समस्यांशी संबंधित सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडीओ आणि मेसेजवर लक्ष ठेवण्याचे आदेश गुप्तचर विभागाला देण्यात आले आहेत. अफवा पसरविण्याचा किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
एलपीजी एजन्सी, पेट्रोल पम्प आणि इतर पुरवठा केंद्राबाहेरील गर्दी नियंत्रणात आणून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार किंवा साठवणूक तसेच इतर इंधनाचा काळाबाजार होत असेल तर त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पाईप गॅस पुरवठ्यावर काय परिणाम होणार?
एलपीजी तुटवड्याचा अद्याप पाइपद्वारे पुरवठा होणाऱ्या गॅसवर (PNG) परिणाम झालेला नाही. या दोघांची वितरण व्यवस्था वेगवेगळी आहे. एलपीजी हे सिलिंडरमधून पुरवले जाते, तर पीएनजी पाईपलाईनच्या जाळ्याद्वारे वितरीत होते. मात्र एलपीजीचा दीर्घकाळ तुटवठा भासल्यास अनेक ग्राहक पीएनजीकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक गॅस वितरण व्यवस्थेवर ताण येऊ शकतो.
