पणजी विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या एका वरिष्ठ आमदाराने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याकरिता पक्ष सोडण्याची धमकी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर, कुठल्याही व्यक्तीला पक्ष सोडण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे राज्यातील माजी मंत्री आणि सेंट क्रूझ येथील विद्यमान आमदार अ‍ॅटॅनॅसिओ मोन्सेराट यांनी आपण पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्यासाठी पक्षाचा राजीनामा देऊ, असे जाहीर केले आहे. मनोहर पर्रिकर यांनी केंद्रात मंत्रिपद स्वीकारण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे.
‘एखाद्याला पक्षातून बाहेर पडण्याची इच्छा असेल, तर आम्ही त्याला थांबवू शकत नाही. मात्र याच वेळी राजकारणात विचारधारेला महत्त्व असते. या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेची कास सोडू नये, अशी मी त्यांना विनंती करेन,’ असे दिग्विजय सिंह वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
काँग्रेसमधील लोकांनी पक्ष सोडून प्रादेशिक पक्ष स्थापन केले आणि नंतर परत आले, अशी उदाहरणे आहेत. अशी ये-जा नेहमीच सुरू असते, परंतु काँग्रेसमधील बहुतांश लोकांचा धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि समानता या विचारधारेवर विश्वास आहे, असेही सिंह यांनी सांगितले.