Divorce for refusal of marital relations: सत्संगाच्या परवानगीशिवाय पत्नीने वैवाहिक संबंधात राहण्यास नकार दिल्यामुळे पतीने घटस्फोटाची मागणी करणारी केलेली याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली. यानंतर पतीने झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली पण, उच्च न्यायालयाने देखील कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम राखत घटस्फोट नाकारला. न्यायमूर्ती सुजित नारायण प्रसाद आणि न्यायमूर्ती अरुण कुमार राय यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
निकाल देताना कोर्ट काय म्हणाले?
“पत्नीने हिंदू धर्माच्या चौकटीत राहून एखाद्या गुरु किंवा धर्माचे पालन केल्यास, त्याचा आधार घेऊन पतीला घटस्फोटाची मागणी करता येत नाही”, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
“शिष्यत्व घेऊन सांसारिक जीवन आणि वैवाहिक कर्तव्यांपासून पूर्णपणे दूर जाणे, घरगुती जबाबदाऱ्या सोडणे किंवा वैवाहिक नातेसंबंधाला हानी पोहोचवणे, अशा अत्यंत मानसिक क्रूर गोष्टींच्या आधारे खटला चालवला जाऊ शकतो. पण, या प्रकरणात क्रूरतेचा मुद्दा सिद्ध करण्यात पती अयशस्वी ठरला आहे”, असे हा निकाल देताना कोर्टाने म्हटले आहे.
नक्की प्रकरण काय?
‘लग्नानंतर पत्नी दोनच दिवस सासरी थांबली, सत्संगातील शिष्य असल्याने तिने संसार करण्यास नकार दिला’, असा आरोप पतीने केला आहे. सत्संगातून परवानगी मिळाल्याशिवाय संसार आरंभण्यास तिने नकार दिल्याचे पतीने आरोपात म्हटलंय. “दिक्षा घेऊन सत्संगाचा सदस्य होण्यासाठी पत्नी वारंवार विनंती करत होती. वृद्ध आई – वडिलांपासून दूर राहत असल्याचे सांगत ती पुन्हा सासरी परतलीच नाही”, असेही पतीने याचिकेत म्हटले होते.
कौटुंबिक ते उच्च न्यायालयात धाव
पत्नीकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप करत पतीन घटस्फोटाची मागणी केली. कौटुंबिक न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यानंतर घटस्फोट देण्यास नकार दिला व पतीची याचिका फेटाळून लावली. पतीने कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या निकालाला झारखंड उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण, उच्च न्यायालयाने देखील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम राखत घटस्फोट देण्यास नकार देऊन याचिका फेटाळली.

