Premium

कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

जी २० परिषदेसाठी आलेल्या ट्रुडो यांना परिषद संपल्यानंतरही दोन दिवस नाईलाजाने दिल्लीत थांबावं लागलं होतं.

canada prime minister justin trudeau (1)
जस्टिन ट्रुडो यांचं जी २० परिषदेवेळीच काही बिनसलं होतं? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दोन दिवसांपूर्वी भारतावर गंभीर आरोप केले. जून महिन्यात खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली. या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा जस्टिन ट्रुडो यांनी थेट कॅनडाच्या संसदेत बोलताना केला. त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले असून भारतानं हे आरोप फेटाळले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून आपापल्या नागरिकांना संबंधित देशात जाताना काळजी घेण्याचेही निर्देश दिले आहेत. मात्र, या सगळ्याला सुरुवात करणारे जस्टिन ट्रुडो यांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय घडलंय गेल्या दोन दिवसांत?

गेल्या दोन ते तीन दिवसांत घडलेल्या घडामोडींमुळे भारत व कॅनडामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. जून महिन्यात खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या झाली. या प्रकरणाच्या तपासानंतर दोन दिवसांपूर्वी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशाच्या संसदेसमोर केलेल्या निवेदनात भारताचा या प्रकरणात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, कॅनडा सरकारने भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टीही केली. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर तीव्र पडसाद उमटले.

सर्वप्रथम भारतानं जस्टिन ट्रुडो यांचे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. भारत कायद्याला सर्वोच्च स्थान देणारा देश असल्याचं परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काढलेल्या जाहीर निवेदनात नमूद करण्यात आलं होतं. शिवाय भारतानंही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली. त्यापाठोपाठ दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांना दुसऱ्या देशात अधिक सतर्क राहण्याच्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या.

व्हिसा सेवा स्थगित

दरम्यान, या सगळ्या घडामोडी चालू असताना कॅनडामध्ये भारताची व्हिसा सेवा देण्याचं काम करणाऱ्या एजन्सीनं आपली सेवा ‘ऑपरेशनल’ अडचणींमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केल्याचं जाहीर केलं. कॅनडाच्या आरोपांना हे भारताचं सडेतोड उत्तर मानण्यात आलं. मध्येच काही काळ या एजन्सीनं संबंधित माहिती आपल्या संकेतस्थळावरून काढली होती. मात्र, ती पुन्हा तिथे टाकण्यात आली व नंतर रीतसर निवेदनच या एजन्सीनं जारी केलं.

Indians in Canada: भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा थांबवली; हरदीप निज्जर हत्या प्रकरणातील आरोपांनंतर मोठा निर्णय…

पण या सगळ्याची सुरुवात जिथून झाली, ते हत्या प्रकरणाचे आरोप करणारे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं ते भारतात जी २० परिषदेसाठी आले तेव्हाच काहीतरी बिनसलं होतं, असं आता बोललं जात आहे. याला कारणही तसंच आहे. कारण अवघ्या १० दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हास्यवदनाने हस्तांदोलन करणारे ट्रुडो अचानक भारतविरोधी राग कसा आळवायला लागले? असा प्रश्न सगळ्यांना पडला.

विशेष सुरक्षाव्यवस्थेची रूम नाकारली!

जस्टिन ट्रुडो यांना ११ सप्टेंबर रोजी जी २० परिषद संपल्यानंतरही दोन दिवस दिल्लीतच राहावं लागलं होतं. त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे ते इथे राहिले. मात्र, दिल्लीतील आपल्या मुक्कामादरम्यान ट्रुडो यांनी भारतीय सुरक्षा यंत्रणेकडून पुरवलेल्या विशेष प्रेसिडेंशियल रूममध्ये राहण्यास नकार दिला होता. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रेसनं हे वृत्त दिलं आहे.

Indians in Canada: “कॅनडातील हिंदू दहशतीच्या छायेखाली”, भारतावरील आरोपांनंतर कॅनडाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “खलिस्तानी…”

जी २० परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी दिल्लीच्या ललित हॉटेलमध्ये विशेष सुरक्षा पुरवण्यात आलेल्या प्रेसिडेन्शियल रूम तयार करण्यात आल्या होत्या. हा भाग मूळ हॉटेलपासून पूर्णपणे वेगळा ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी ट्रुडो यांचीही व्यवस्था एका आलिशान रुममध्ये करण्यात आली होती. पण ट्रुडो यांनी ही रूम नाकारली. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मग हॉटेलमध्ये दुसरी रूम बुक करून तिथे ट्रुडो यांच्या वास्तव्याची व्यवस्था केली. या सगळ्या प्रकारात पंतप्रधानपदी असणाऱ्या ट्रुडो यांच्या सुरक्षेची नैतिक जबाबदारी असणाऱ्या भारतीय सुरक्षा यंत्रणांची चांगलीच त्रेधातिरपीट झाली.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर ट्रुडो यांचं तेव्हापासूनच काहीतरी बिनसलं होतं का? यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कारण भारतातून परतल्यानंतर अवघ्या १० दिवसांच्या आत ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Canada prime minister justin trudeau rejected presidential suite during g 20 sumit in delhi pmw

First published on: 21-09-2023 at 15:48 IST
Next Story
“महिला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करा”, काँग्रेसच्या मागणीवर जेपी नड्डा म्हणाले, “२०२९ मध्ये…”