टोरोंटो : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडामध्ये हत्या घडविण्यात भारताचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाने केला असून त्याला गुप्तचरांनी दिलेली माहिती, संदेशवहन यंत्रणांकडून मिळालेले पुरावे आणि कॅनडाच्या फाईव्ह आय इंटेलिजन्स नेटवर्कमधील सहकारी देशाकडून मिळालेल्या माहितीचा आधार आहे, असे वृत्त कॅनडातील माध्यमांनी तेथील सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
खलिस्तानवादी निज्जर याच्या हत्येत भारताच्या गुप्तचरांचा हात असू शकतो, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी केल्यानंतर उभय देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. निज्जर याची हत्या ब्रिटिश कोलंबियात झाली १८ जून रोजी झाली होती. निज्जर याला भारताने २०२० मध्ये दहशतवादी घोषित केले होते. ट्रुडो यांनी केलेले आरोप भारताने फेटाळून लावले असून अशा बिनबुडाच्या आरोपांबद्दल संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणातून कॅनडाने एका भारतीय अधिकाऱ्याला देश सोडण्यास सांगितल्यानंतर भारतानेही कॅनडाच्या एका अधिकाऱ्याला भारत सोडण्यास सांगितले.




हेही वाचा >>> काश्मीरचा वाद चर्चेतून सोडवावा; सुटकेनंतर मीरवाइज यांचे मत,‘जगात युद्धाला स्थान नाही’, या मोदी यांच्या विधानाचा दाखला
कॅनडातील सीबीसी न्यूजने गुरुवारी दिलेल्या वृत्तानुसार, निज्जर याच्या हत्येचा काही महिने तपास केल्यानंतर कॅनडा सरकारच्या हाती गुप्तचर तसेच गोपनीय तांत्रिक माहिती आली. यात कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसह अन्य भारतीय अधिकाऱ्यांतील संभाषणाचा समावेश आहे, असा दावा कॅनडा सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. ही माहिती केवळ कॅनडातून मिळालेली नाहीत, तर फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्समधील एका अनामिक सहकारी देशानेही कॅनडाला ही माहिती पुरविली आहे. फाईव्ह आय नेटवर्कमध्ये अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझिलंडचा समावेश आहे.
निज्जर याच्या हत्येच्या तपासासाठी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा भारतात जाऊन सहकार्याची विनंती केली होती, असेही या वृत्तात म्हटले आहे. ऑगस्टच्या मध्यात कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर सल्लागार जोडी थॉमस हे चार दिवस भारतात होते. त्यानंतर ते पुन्हा सप्टेंबरमध्ये भारतात गेले होते. याच दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तणावपूर्ण चर्चा झाली, असे येथील माध्यमांनी म्हटले आहे.
याबद्दल कॅनडाच्या उपपंतप्रधान क्रिस्टीया फ्रीलॅन्ड यांना विचारणा केली असता, त्या म्हणाल्या की, तपासकामावर परिणाम होऊ नये, तसेच फाईव्ह आय पार्टनरबाबतच्या कटिबद्धतेतून यावर काही बोलणे योग्य होणार नाही. परंतु कायद्याच्या प्रक्रियेत हे पुरावे उघड केले जातील, असे सीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.
हेही वाचा >>> Krishna janmabhoomi case: शाही ईदगाह मशिदीच्या पाहणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाकडे सोपवला
कॅनडाचे आपत्कालीन विभागाचे मंत्री हरजित सज्जन यांनी म्हटले आहे की, निज्जर याच्या हत्येच्या तपासाची बातमी माध्यमांत येणार होती. त्यामुळे पंतप्रधान ट्रुडो यांनी आधीच त्याची जाहीर वाच्यता केली.
‘विद्वेषपूर्ण प्रचाराला स्थान नाही’
टोरोंटो : कॅनडातील हिंदूंनी हा देश सोडून जावे, असे धमकावणारी ध्वनिचित्रफीत जारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर, कॅनडात असा विद्वेषपूर्ण प्रचार तसेच धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, असे कॅनडा सरकारने म्हटले आहे. कॅनडात अशा विद्वेषाला कोणतेही स्थान नाही. नागरिकांनी परस्परांचा सन्मान ठेऊन कायद्याचे पालन करावे, असे सरकारने म्हटले आहे.