Canada school shooting : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथे भीषण गोळीबाराच्या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या महिलेबाबत काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा हल्ला करणारी एक १८ वर्षीय ‘ट्रान्स वुमन’ असू तिला मानसिक आरोग्याच्या समस्या असल्याची बाब समोर आली आहे. इतकेच नाही तर हल्लेखोर जेस्से व्हॅन रूटसेलर (Jesse Van Rootselaar) ने तिच्या आधीच्या शाळेत जाऊन गोळीबार करण्यापूर्वी घरात स्वत:ची आई आणि सावत्र भावाचीही हत्या केल्याचे धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या हत्यांमागे नेमकं कारण काय होतं? याबद्दल अद्याप पोलिसांनी खुलासा केलेला नाही.

ब्रिटिश कोलंबियाच्या पॅसिफिक प्रांतातील टम्बलर रिज या २४०० लोकसंख्येच्या भागात मंगळवारी ही गोळीबाराची घटना घडली. या भीषण घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरानेही आत्महत्या केली.

हल्लेखोराबद्दल काय माहिती समोर आली?

रूटसेलर ही एक ‘ट्रान्सजेंडर वुमन’ होती, जिचा जन्म पुरुष म्हणून झाला होता. तसेच ती लक्ष्य करण्यात आलेल्या शाळेतून चार वर्षांपूर्वी बाहेर पडली होती, असे वृत्त एफपीने पोलिस कमांडर ड्वेन मॅकडॉनल्ड्स यांच्या हवाल्याने दिले आहे. अधिकार्‍याने सांगितले की, हल्लेखोराकडे यापूर्वी बंदुकीचा परवाना होता, पण त्याची मुदत संपली होती आणि तिच्या घरातून यापूर्वी शस्त्रे जप्त करण्यात आली होती, पण कालांतराने ती परत करण्यात आली.

रूटसेलरला मानसिक आजारांची पार्श्वभूमी देखील राहिलेली आहे, यादरम्यान पोलीस तिची विचारपूस करण्यासाठी अनेकदा तिच्या घरी गेले होते.

इतकेच नाही तर एकापेक्षा जास्त वेळा तिला प्रोव्हिन्शनल मेंटल हेल्थ अॅक्ट अंतर्गत तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते, असेही मॅकडोनल्ड यांनी सांगितले. ज्या शाळेवर हल्ला केला गेला तिथे ती पूर्वी शिकत होती पण चार वर्षांपूर्वी तिने शाळा सोडली होती, असेही त्यांनी सांगितले.

गोळीबारावेळी काय झालं?

ही घटना कॅनडामध्ये झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्वात भीषण गोळीबाराच्या घटनांपैकी एक होती. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर २४ जण जखमी झाले आहेत.

मॅकडोनल्ड यांनी सांगितले की रूटसेलरने पहिल्यांदा घरातच तिची ३९ वर्षीय आई आणि ११ वर्षीय सावत्र भाऊ यांची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या जुन्या शाळेव हल्ला चढवला.

गोळीबाराच्या घटनेनंतर जेव्हा पोलीस शाळेत गेले तेव्हा त्यांना ६ लोक मृतावस्थेत आढळून आले, ज्यामध्ये ३९ वर्षीय महिला शिक्षक आणि ५ विद्यार्थी यांचा समावेश होता. मृतांमध्ये तीन १२ वर्षीय मुली आणि १३ आणि १२ वर्षीय दोन मुलांचा समावेश आहे. एक पीडित पायऱ्यांवर तर उरलेले लायब्ररीमध्ये आढळून आले असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच हल्लेखोराचा शाळेतील पीडितांशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मॅकडोनल्ड म्हणाले की, पहिला फोन कॉल आल्यानंतर दोन मिनिटांतच पोलीस अधिकारी शाळेत पोहोचले. तेव्हा पोलिसांच्या दिशेनेही गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र अद्याप हल्ल्याचा हेतू स्पष्ट झालेला नाही, असेही पोलिसांनी सांगितले.