Jasman Sekhon Canada Shooting: Surrey gang war claims life of 27-year-old Indian origin youth : कॅनडातील सरे शहरात शनिवारी रात्री एका भारतीय वंशाच्या २७ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या मते हा एक लक्ष्यित हल्ला होता आणि याचा संबंध संघटित गुन्हेगारीशी असण्याची शक्यता आहे. इंटिग्रेटेड होमिसाइड इन्व्हेस्टिगेशन पथकाने(IHIT) सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, पीडिताची ओळख जसमान सेखोन (Jasman Sekhon) म्हणून पटली आहे.
गोळीबाराची ही घटना सरेमधील सलिव्हन हाईट्स परिसरातील एका टाऊनहाऊस कॉम्प्लेक्समध्ये घडली. शनिवारी संध्याकाळी ६:३९ च्या सुमारास ६० एव्हेन्यूच्या १५१०० ब्लॉक मध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच सरे पोलीस दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे त्यांना जसमान सेखोन याला गोळी लागल्याने जखमी झालेल्या अवस्थेत आढळला. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण त्याचा जागीच मृत्यू झाला.
IHITने दिलेल्या माहितीनुसार, सेखोन याचा यापूर्वीही पोलिसांशी संबंध आला होता आणि तो ड्रग्जच्या धंद्यात गुंतलेला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, एका डार्क रंगाची एसयुव्ही कार सेखोनचा पाठलाग करत होती, त्यानंतर कारमधून दोन व्यक्ती उतरल्या आणि त्यांनी त्याच्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली. गोळीबाराच्या घटनेनंतर १५ मिनिटांनी, सरेमधील १८६ स्ट्रीट आणि ४४ एव्हेन्यूजवळ एक निळ्या रंगाची ह्युंदाई एसयूव्ही जळत असल्याचे आढळून आले.
तपासकर्त्यांकडून जळालेले वाहन या हत्येच्या घटनेशी संबंधित आहे का याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेनंतर काही अंतरावरच एक जळत असलेले वाहन आढळणे ही, पोलिसांच्या मते हत्या टोळीयुद्धातून झाली असल्याची खूण आहे.
