Donald Trump On Canada : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून निर्णयांचा धडाका लावला आहे. जगातील अनेक देशांवर ट्रम्प यांनी मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादलं आहे. भारतावर देखील एकूण ५० टक्के आयात कर लादला असून त्याचा भारताला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यातच मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत.
ग्रीनलँडवरील महत्त्वाकांक्षी अशा ‘गोल्डन डोम’ या क्षेपणास्त्र संरक्षण प्रकल्पाला विरोध करून कॅनडाने उत्तर अमेरिकेच्या सुरक्षेला हानी पोहोचवल्याचा आरोप ट्रम्प यांनी नुकताच केला होता. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला नवी धमकी दिली आहे.
अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सर्व विमानांवर कॅनडावर ५० टक्के कर लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. त्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेतील वाद आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कॅनडामध्ये बनवलेल्या आणि अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सर्व विमानांवर ५० टक्के कर लावण्याची धमकी ट्रम्प यांनी दिल्यानंतर आता कॅनडा काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “कॅनडाने गल्फस्ट्रीम ५००, ६००, ७०० आणि ८०० जेट्सना प्रमाणित (Certification) करण्यास बेकायदेशीरपणे नकार दिला. कॅनडाने अमेरिकन कंपनी गल्फस्ट्रीमला प्रमाणित न केल्यास अमेरिका बॉम्बार्डियर ग्लोबल एक्सप्रेस आणि कॅनेडियन बनावटीच्या विमानांचं प्रमाणपत्र रद्द करेल. यामध्ये कॅनडाच्या सर्वात मोठ्या विमान उत्पादक कंपनीने बनवलेल्या विमानांचा समावेश असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
“कॅनडा गल्फस्ट्रीमच्या उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालत आहे. जर कोणत्याही कारणास्तव ही परिस्थिती सुधारली नाही तर अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या कोणत्याही किंवा सर्वच विमानांवर कॅनडाला ५० टक्के आयात कर द्यावा लागेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

