Canada PM Carney On Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी कॅनडाला मोठा धक्का देत कॅनडाबरोबरच्या सर्व व्यापाराच्या वाटाघाटी अचानक स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कॅनडावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लादलं होतं. अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता होती. ट्रम्प यांनी कॅनडावर अचानक अशा प्रकारचा अतिरिक्त टॅरिफ का लादलं? याबाबत सवाल उपस्थित करण्यात आले होते. मात्र, अमेरिकेने कॅनडावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लादल्यानंतर कॅनडाने रोनाल्ड रीगन यांच्याबाबतच्या जाहिरातीच्या वादावरून अमेरिकेची माफी मागितली आहे.
कॅनडाच्या पंतप्रधानांनी मागितली ट्रम्प यांची माफी
रोनाल्ड रीगन यांच्या आणि टॅरिफ विरोधी जाहिरातीबद्दल कॅनडाच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांची माफी मागितली. मार्क कार्नी यांनी सांगितलं की, त्यांनी माजी अमेरिकन नेते रोनाल्ड रीगन यांच्या टॅरिफ विरोधी जाहिरातीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची माफी मागितली आहे. मार्क कार्नी म्हणाले की, “मी राष्ट्रपतींची माफी मागितली. कारण राष्ट्रपती (ट्रम्प) नाराज झाले होते. आता अमेरिकेने तयारी दर्शवल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही देशातील व्यापार चर्चा सुरू होईल.” या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.
अमेरिकेने कॅनडावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याचं कारण काय?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या भाषणामधील शब्दांची मोडतोड करत कॅनडातील एका प्रांतातील सरकारने जाहिरात केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला. या कारणास्तव ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर सुरू असलेल्या व्यापार कराराच्या चर्चेला तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. तसेच कॅनडावर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याचाही निर्णय घेतला होता.
अमेरिका आणि कॅनडामध्ये नेमकी काय घडलं होतं?
अमेरिका आणि कॅनडामध्ये व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असताना अचानक कॅनडातील ओंटारियो प्रांतामधील सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत रोनाल्ड रीगन यांच्या १९८७ मधील मुक्त आणि निष्पक्ष व्यापार अशा संदर्भातील भाषणातील काही भाग वापरण्यात आला असल्याचा दावा अमेरिकेने केला होता. यावरूनच अमेरिकेने आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती.
