वॉशिंग्टन : कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतात हवामान बदलाने बाधित झालेला जगातील पहिला रुग्ण नोंदला गेला आहे. डॉक्टरांनी त्याचे निदान करताना ‘हवामान बदलांमुळे झालेला आजार’ असे  आजाराचे वर्णन केले आहे. या व्यक्तीला श्वाास घेण्यात त्रास होत होता.हा रुग्ण एक महिला असून कुटेनेस येथील वणव्यांमुळे तिला अस्थम्याचा त्रास झाला, असे कॅनडाच्या ‘टाइम कोलोनिस्ट’ वृत्तपत्राने म्हटले आहे. कुटेनेस भागात ही महिला वास्तव्यास होती, हे ठिकाण ब्रिटिश कोलंबिया प्रांतात आहे. तेथे चालू आर्थिक वर्षांत १६०० वणवे पेटले होते, असे बीसी वाइल्ड फायर सव्‍‌र्हिस संकेतस्थळाने म्हटले आहे. कुटेनेस लेक रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. काइल मेरिट यांनी म्हटले आहे की, उष्णतेच्या लाटेमुळेही आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्यात मधुमेह, हृदयरोग अशा रोगांचा समावेश आहे.