नवी दिल्ली, पीटीआय : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संरक्षण दल भरतीची अग्निपथ योजना ही दिशाहीन असल्याची टीका करून, ही योजना मागे घेण्यासाठी माझा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा निर्धार व्यक्त केला आहे. या योजनेविरुद्ध संतप्त व हिंसक निदर्शने करणाऱ्या युवकांनी आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहनही केले.

युवकांना उद्देशून केलेल्या हिंदी निवेदनात सोनिया यांनी नमूद केले आहे, की सरकारने जाहीर केलेली नवीन भरती योजना ही दुर्दैवी असून, संपूर्ण दिशाहीन आहे. तुमच्या गरजांकडे व मागण्यांकडे दुर्लक्ष करून ही योजना तयार करण्यात आली आहे. माझ्या पक्षाचा या युवकांना पाठिंबा आहे. या योजनेविषयी अनेक संरक्षण तज्ज्ञ, निवृत्त व ज्येष्ठ संरक्षण दल अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लष्करातील काही लाख रिक्त जागांच्या भरतीसाठी तीन वर्षांचा विलंब झाल्याने युवकांची व्यथा-वेदना मी समजू शकते. जे युवक हवाई दलाच्या परीक्षा देऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा सर्वासाठी मी सहवेदना व्यक्त करते. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना मागे घेण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असे आश्वासन मी देते. खऱ्या देशभक्ताप्रमाणे सत्याच्या मार्गावर चालत, शांततापूर्ण व अहिंसक पद्धतीने आम्ही आपला आवाज उठवू, असे त्यांनी म्हटले आहे.