Price Cap Scheme on Cancer Drug: देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे असून अत्यंत महागड्या कर्करोग प्रतिबंधक औषधांच्या किमतींमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. औषध वितरकांच्या खरेदी मूल्यावर कमाल ३० टक्के इतकीच व्यापार नफा मर्यादा निश्चित करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.
या निर्णयामुळे काही पेटंटप्राप्त औषधांसह अत्यंत महागड्या कर्करोग उपचारांवरील औषधांची एमआरपी तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते, अशी माहिती औषध निर्माण विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
कर्करोगाच्या औषधांवरील प्रचंड नफेखोरीला आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये एका प्रायोगिक प्रकल्पांतर्गत ४२ कर्करोग औषधांच्या व्यापार नफ्यावर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र आता थेट अतिमहागड्या औषधांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशा महागड्या औषधांवर थोड्या नफ्यामुळेही रुग्णांच्या खिशावर पडणारा भार मोठ्या प्रमाणावर वाढतो, हे लक्षात घेऊन ही नवी नियमावली आखण्यात येत आहे.

दीर्घकाळ उपचार घेणाऱ्या कर्करोग रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ७० टक्क्यांपर्यंत दर कमी झाल्यास रुग्णांची उपचारावरील मोठी रक्कम वाचू शकेल.
दरम्यान या निर्णयाचा प्रत्यक्षात किती फायदा होईल, हे अंतिम यादीत नेमकी कोणती औषधे समाविष्ट केली जातात आणि सध्याच्या नफा मर्यादेतील कपातीचा किती लाभ प्रत्यक्ष रुग्णांपर्यंत पोहोचतो, यावर अवलंबून असणार आहे, असेही द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील एक समिती सध्या या औषधांची अंतिम यादी तयार करत आहे. पुढील दहा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी अपेक्षित आहे. या यादीत समावेश करण्यासाठी संबंधित औषध भारतात कर्करोग उपचारासाठी मान्यताप्राप्त असणे, त्याचा नियमित वापर असणे आणि ते औषध ‘महागडे’ असणे हे मुख्य निकष ठरवण्यात आले आहेत.
केवळ महागड्या औषधांवरच लक्ष का?
“यादी तयार करताना संबंधित औषधाची किंमत अधिक असणे हा अत्यंत महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे,” असे औषध निर्माण विभागाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जर हा ३० टक्क्यांचा नियम सर्वच स्वस्त औषधांना सरसकट लागू केला, तर कंपन्यांना मार्केटिंग आणि वितरण खर्च भागवणे कठीण होईल आणि त्या अशा औषधांची विक्री करणे थांबवतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे स्वस्त औषधांच्या पुरवठा साखळीवर कोणताही विपरीत परिणाम न होऊ देता, रुग्णांना ज्या औषधांचा सर्वाधिक आर्थिक फटका बसतो, केवळ अशाच औषधांना या कक्षेत आणण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. नियोजनानुसार ही अंमलबजावणी झाल्यास देशातील महागड्या कर्करोग उपचार पद्धतींच्या किमतींमध्ये लक्षणीय बदल घडून येण्याची शक्यता आहे.
