भारताबरोबरचे अनेक प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्याची तयारी दर्शवणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संदर्भात एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. मोस्ट वॉण्टेड असणाऱ्या दाऊदबद्दल एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलताना, भूतकाळासाठी मला जबाबदार धरणे योग्य नसल्याचे सांगतानाच हे प्रकरण आपण हाती घेतल्याचेही इम्रान यांनी सांगितले.

इस्लामाबाद येथे एका भारतीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना इम्रान खान यांनी भूतकाळात जगण्यात अर्थ नसल्याचे सांगतानाच दहशतवाद पाकिस्तानसाठीही घातक असल्याचे मत नोंदवले. ‘आपण भूतकाळात जगू शकत नाही. आमच्याकडेही भारतात वॉण्डेट असणाऱ्यांची यादी आहे. तसेच पाकिस्तानच्या जमिनीवर दहशवादी कारवाया होणे आमच्या फायद्याचे नाही,’ असे स्पष्ट मत इम्रान यांनी व्यक्त केले. दाऊद हा १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या १२ बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईण्ड होता. या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ जणांना प्राण गमवावे लागले होते तर ७०० हून अधिकजण जखमी झाले होते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनेही दाऊदला दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे. भारताने अनेकदा दाऊद पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे सांगितले आहे. या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेनेही दाऊद कराचीमध्येच असल्याचे सांगत यावर शिक्कामोर्तब केले. तरीही पाकिस्तानने अद्याप दाऊदवर कोणतीही कारवाई केलेली नाही हे विशेष लपून वास्तव्य करत आहे.

दाऊदला १९९३ बॉम्बस्फोटांमध्ये मदत करणारे आणि बॉम्बस्फोटांमध्ये फरार झालेले साथिदार टायगर मेमन, याकुब मेमन आणि आबू सालेम यांना अटक करुन शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र स्फोटांनंतर २५ वर्षे झाली तरी दाऊद अद्याप भारताच्या हाती लागलेला नाही. त्यामुळेच आता भारताबरोबरचे सर्व प्रश्न चर्चेने सोडवण्याची भाषा कऱणारे इम्रान खान तरी दाऊद प्रकऱणात भारताला मदत कऱणार का हे येणारा काळच सांगेल.