नौदलाच्या आयएनएस सिंधूरक्षक पाणबुडीला आग लागण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येणार नाही; मात्र, तूर्ततरी तसे काही वाटत नाही, असे नौदलप्रमुख ऍडमिरल डी. के. जोशी यांनी बुधवारी मुंबईमध्ये पत्रकारांना सांगितले. मंगळवारी मध्यरात्री मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डवर सिंधूरक्षक पाणबुडीमध्ये दोन स्फोट झाल्यामुळे त्याला आग लागली. आगीमुळे पाणबुडीमध्ये असलेल्या तीन अधिकाऱयांसह १८ नौसैनिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी, नौदलप्रमुख डी. के. जोशी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जोशी यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती दिली.
ते म्हणाले, एका पाणबुडीमध्ये ज्वालाग्रही अनेक पदार्थ असतात. त्यामध्ये इंधन, बॅटरी, स्फोटके, ऑक्सिजन सिलिंडर असे अनेक पदार्थ असतात. यापैकी कोणत्याही एकामुळे किंवा दोघांच्या एकत्रित येण्यामुळे स्फोट होऊ शकतो. सिंधूरक्षकमध्ये नेमका कशामुळे स्फोट झाला, हे आताच सांगता येणार नाही. मंगळवारी मध्यरात्री सुरुवातीला पाणबुडीमध्ये छोटा स्फोट झाला आणि त्यानंतर लगेचच दुसऱा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला दोन तास लागले. दुर्घटनेनंतर नौदलाच्या जवानांनी सिंधूरक्षक पाणबुडीचा मुख्य प्रवेशद्वार उघडले असून, त्यांनी आतील पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.