काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस इथं भेट घेतली. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचीही ज्यो बायडेन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कधी याबद्दल व्हाईट हाऊसकडूनही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. व्हाईट हाऊसचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, त्यांना या चर्चेबद्दल कोणताही अंदाज वर्तवता येत नाही.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यान उच्चस्तरीय चर्चा करण्याचं नियोजन आहे. मात्र इमरान खान यांनी सांगितलं की, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बायडेन सध्या आपल्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांच्याशी बोलणं होऊ शकलेलं नाही. अफगाणिस्तानातल्या परिस्थितीवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत हवी असल्याने हा संवाद होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जेन साकी यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, बायडेन आणि खान यांच्यात काही चर्चा होणार आहे की नाही, याबद्दल आम्हाला काहीही अंदाज नाही. जर काही चर्चा झाली तर निश्चितच माध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल.