पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज (६ ऑक्टोबर) पुन्हा एकदा दिल्लीत दाखल झालेत. या दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदींसोबतच्या भेटीत अमरिंदर सिंग कृषी कायदे आणि लखीमपूर खेरी हिंसाचाराबाबत चर्चा करतील. विशेष म्हणजे अमरिंदर सिंग यांनी याआधी कृषी कायदे रद्द करण्याचीही मागणी केलीय. त्यामुळे हा मुद्दा या भेटीत ते मांडणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेचे पडसाद पंजाबमध्ये पडण्याच्या शक्यतेवरही अमरिंदर सिंग मोदींसोबतच्या भेटीत बोलतील. अमरिंदर सिंग यांच्या जवळील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “लखीमपूर खेरीची प्रतिक्रिया पंजाबमध्ये उमटल्यास सीमेवरील या राज्यात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज कुणीही लावू शकतं.”

अमरिंदर सिंग यांना पुन्हा सरकार स्थापन करण्याबाबत विश्वास

अमरिंदर सिंग यांना आगामी विधानसभेनंतर पुन्हा सरकार स्थापन करण्याबाबत विश्वास असल्याचंही सांगितलं जातंय. यासाठी ते या दिल्ली दौऱ्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, पण काँग्रेस सोडेल असं विधान केलं होतं. त्यामुळे आगामी काळात त्यांची राजकीय वाटचाल कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

“आगामी निवडणुकीत काँग्रेसला १६ पेक्षा अधिक जागा मिळणार नाही”

अमरिंदर सिंग यांचे राजकीय सचिव निवृत्त मेजर अमरिंदर सिंग नट्ट म्हणाले, “कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा ज्या प्रकारे अपमान झाला त्यानंतर आता काँग्रेसला आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत १६ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. आम्हीच सरकार स्थापन करू. केवळ थांबा आणि पाहत राहा. तृणमूल काँग्रेससह आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. आम्ही पुन्हा सत्तेत येऊ.”

हेही वाचा : सिद्धूच पंजाब प्रदेशाध्यक्ष राहतील आणि निवडणुकीचं नेतृत्व करतील, सल्लागाराचं मोठं विधान

“आमची सुरक्षा का कमी करण्यात आली?”

नट्ट यांनी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी अमरिंदर सिंग यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची सुरक्षा कमी केल्यावरुन जोरदार टीका केली. हा निर्णय राजकीय सुडबुद्धीने घेतल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला. “आम्ही देखील काँग्रेसचा भाग आहोत. आम्ही राष्ट्रीय नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत आहोत. आमची सुरक्षा का कमी करण्यात आली?” असा प्रश्न नट्ट यांनी केला. तसेच सरकारने सुरक्षा कमी करण्याआधीच आम्ही सुरक्षा रक्षकांना परत पाठवलं होतं असा दावाही केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Capt amarinder singh in delhi may meet pm narendra modi pbs
First published on: 07-10-2021 at 13:51 IST