दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात सहवैमानिकाने हल्ला केल्यानंतर भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी दाखवलेल्या धैर्याचं जगभरातून कौतुक होत आहे. गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे प्रवासी आणि केबिन क्रूला आत प्रवेश करून हल्लेखोरावर नियंत्रण मिळवता आलं. या घटनेनंतर मुंबईतील त्यांचे माजी शेजारी डॉ. जनित शाह यांनी स्मित मच्छार यांच्या स्वभावाबद्दल सांगितले. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.
डॉ. शाह यांनी एएनआयला सांगितलं की, स्मित मच्छार हे प्रतिभावान, शांत स्वभावाचे आणि चांगले व्यक्ती आहेत. मच्छार दुबईला जाण्यापूर्वी जवळपास १० ते १५ वर्षे ते शेजारी राहत होते. त्यानंतर स्मित मच्छार दोन-तीन वर्षांपूर्वी दुबईला गेले.
‘गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी १७४ जणांचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते खरोखरच एक विलक्षण आणि धाडसी व्यक्ती आहेत. ते लवकर बरे व्हावेत आणि त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळावी, हीच सदिच्छा’ अशी भावना डॉ. शाह यांनी व्यक्त केली.
फ्लाईदुबईचे पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, “त्याने धाडसाने सुमारे १८० लोकांचे प्राण वाचवले आहेत. आम्ही तो लवकरात लवकर पूर्ण बरा होऊन सुखरूप परत यावा, अशी प्रार्थना करत आहोत. आमच्या कुटुंबांचे संबंध अतिशय जवळचे असून आम्ही त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्याने अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सध्या आम्हाला केवळ तो कसा आहे याचीच चिंता लागली असून, लवकरच त्याच्या प्रकृतीची काहीतरी चांगली माहिती मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.”
विमानात नेमकं काय घडलं?
३० सप्टेंबरला फ्लायदुबईचं एफझेड १०७३ विमान दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जात होते. या विमानात एकूण १७४ प्रवासी प्रवास होते. इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये स्मित मच्छार आणि त्यांच्या सहवैमानिकामध्ये झटापट झाली. सहवैमानिकाने मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.
या भीषण हल्ल्यात कॅप्टन स्मित मच्छार गंभीर जखमी झाले. त्याचवेळी विमानाची उंची वेगाने कमी होऊ लागली होती. उपलब्ध फ्लाइट-ट्रॅकिंग माहितीनुसार, विमान काही वेळातच हजारो फूट खाली आले. अशा अत्यंत बिकट आणि गंभीर परिस्थितीतही मच्छार यांनी जखमी अवस्थेत कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रसंगावधान राखून इतर प्रवासी आणि केबिन क्रूने कॉकपिटमध्ये प्रवेश करून हल्लेखोराला नियंत्रणात घेतले. यानंतर विमानाला सौदी अरेबियातील ताबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजते. मच्छार यांच्यावर ताबूकमधील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
जखमी असूनही कॉकपिटचा दरवाजा उघडला
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही या घटनेचा उल्लेख करत मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले. गंभीर जखमी असूनही त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्यामुळे इतरांना आत प्रवेश करता आला आणि हल्लेखोराला रोखता आलं, असे नेतन्याहू यांनी सांगितले. या घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही मच्छार यांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.
कोण आहेत कॅप्टन स्मित मच्छार?
स्मित मच्छार यांनी जून २०२२ मध्ये फ्लायदुबईमध्ये कॅप्टन म्हणून काम सुरू केले. त्यापूर्वी त्यांनी मुंबईतील ‘स्पाईस जेट’मध्ये जवळपास ११ वर्षे सेवा बजावली होती. त्यांच्या कारकिर्दीत सुमारे ९,७५० तासांचा प्रदीर्घ उड्डाणाचा अनुभव असल्याचे विविध वृत्त अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे पायलट होणे हे त्यांचे बालपणीचे स्वप्न नव्हते. वयाच्या १९ व्या वर्षी ते कुटुंबाच्या टेक्स्टाइल व्यवसायात जाण्याच्या मार्गावर होते. मात्र, एका एव्हिएशन सेमिनारनंतर त्यांचा कल विमान वाहतूक क्षेत्राकडे वळला आणि त्यांनी पायलट होण्याचा निर्णय घेतला.
‘आईला माझ्या निर्णयाची भीती वाटली होती’
जुन्या मुलाखतीत स्मित मच्छार यांनी पायलट होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांच्या आईला सुरुवातीला भीती वाटत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला आणि पुढे व्यावसायिक पायलट म्हणून कारकीर्द घडवली.
आज त्याच अनुभवाचा आणि प्रसंगावधानाचा उपयोग करून त्यांनी गंभीर संकटाच्या वेळी विमानातील प्रवाशांना वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मच्छार यांच्याबद्दल त्यांच्या माजी शेजाऱ्यांपासून ते भारत आणि इस्रायलच्या नेत्यांपर्यंत अनेकांकडून कौतुक व्यक्त होत आहे.
