पीटीआय, नवी दिल्ली
‘‘कुठलाही कठीण क्षण आला, तर मी ‘हनुमान चालिसा’ म्हणतो. सहवैमानिकाने विमानात हल्ला केल्यानंतरही मी हनुमान चालिसाचे पठण करत होतो. मला खात्री आहे की देवानेच माझे रक्षण केले. मी देशापासून दूर असलो, तरी आपल्या संस्कृतीपासून दूर नसतो,’’ अशी भावना फ्लायदुबई विमानात अतुलनीय धैर्य दाखविणारे भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मच्छार यांच्याशी ‘व्हिडिओ कॉल’द्वारे संवाद साधला. ‘तुम्ही शूर आहात. सारा भारत तुमचे स्वागत करण्यासाठी प्रतीक्षेत आहे,’ असे पंतप्रधानांनी मच्छार यांना सांगितले.
कॅप्टन मच्छार यांनी विमानात घडलेल्या प्रसंगाचे पंतप्रधानांसमोर कथन केले. ‘सहवैमानिकाने विमानात हल्ला केल्यानंतरही विमानातील कुणालाही मरू देणार नाही, असा दृढ निश्चय केला होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत विमानाला वाचविण्याचा प्रयत्न करू, यावर ठाम होतो,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘मी कॉकपिटमध्ये खाली पडलो होतो आणि जखमी होतो. माझ्यामध्ये जी काही ऊर्जा शिल्लक होती, ती वापरून विमान वाचविण्यात मला यश आले. मी एका बाजूला मृत्यूशी झुंजत होतो आणि त्याच वेळी इतर कुणालाही मृत्यूचा सामना करू देणार नाही, असा निर्धार केला होता. तो अतिशय कठीण क्षण होता. विमान खाली कोसळत होते. मला अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. मला मारहाण झाली. पण, मी मला बजावले, की मला उठायला हवे. त्या क्षणी मी कॉकपिटचा दरवाजा उघडला. इतर लोकांनी बजावलेली भूमिकाही तितकीच महत्त्वाची होती,’ असे मच्छार यांनी सांगितले.
मच्छार यांचा अनुभव ऐकून मोदी म्हणाले, ‘भारतीय कुणाचाही जीव घेत नाहीत, तर इतरांचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतात, असे आपला देश या प्रसंगानंतर अभिमानाने सांगू शकेल. शरीराला अनेक जखमा झाल्या असतानाही स्वत:च्या सुरक्षेचा विचार न करता इतर प्रवाशांचा तुम्ही विचार केलात. तुम्ही १४० कोटी भारतीयांची शान वाढविली. मला मनापासून तुमचा अभिमान वाटतो.’
‘मच्छार यांची प्रकृती सुधारावी यासाठी देशभरातील मंदिरात प्रार्थना करण्यात आल्या. अनेक भारतीयांनी महामृत्युंजय मंत्राचा जप केला,’ असे मोदी यांनी त्यांना सांगितले.
शौर्य पुरस्कार देण्याची मागणी
मुंबई : ‘फ्लायदुबई’ विमान पाडण्याचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणी जोर धरत आहे. हवाई दलाचे माजी लढाऊ वैमानिक विंग कमांडर अविनाश चिकटे (निवृत्त) यांनी १४ वर्षांपूर्वी स्मित मच्छार यांच्याबरोबर पहिले उड्डाण केले होते. स्मितने एका व्यावसायिक वैमानिकाच्या कर्तव्यपलिकडे जाऊन प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने स्मित मच्छार यांना शौर्य पुरस्कार द्यावा, अशी त्यांनी मागणी केली.
