Captain Smit Machhar awarded Israel Bravery Award : फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या कथित अपहरण आणि अपघाताचा धोका अत्यंत धैर्याने टळणाऱ्या भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांना इस्रायलच्या ‘मेडल फॉर सिव्हिलिअन ब्रेव्हरी’ या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्झोग यांनी गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली. कॅप्टन मच्छार यांच्या साहसामुळे एक मोठी दुर्घटना टळली, असे गौरवोद्गार हेर्झोग यांनी काढले असून, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
“त्यांना लवकर आणि पूर्णपणे बरे वाटावे, हीच आमची इच्छा आहे. कॅप्टन, धन्यवाद. इस्रायल तुमच्या शौर्याचा सन्मान करतो,” असे हेर्झोग यांनी सांगितले.
नेमकी घटना काय घडली ?
३० सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या ‘एफझेड १०७३’ या विमानात गंभीर सुरक्षा संकट निर्माण झाले होते. ओमानी सहवैमानिक हमाम अल-हमामी याने कॉकपिटमध्ये भारतीय कप्तान स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर विमानाचे ऑटोपायलट बंद करून बोईंग ७३७ एमएएक्स ८ हे विमान ३४ हजार फूट उंचीवरून अचानक खाली झेपावल्याचा दावा करण्यात आला.
गंभीर जखमी झाले असतानाही कॅप्टन मच्छार यांनी अत्यंत प्रसंगावधान राखून कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर तातडीने केबिन क्रू आणि प्रवाशांनी हस्तक्षेप करत हल्लेखोर सहवैमानिकाला नियंत्रणात आणले. यानंतर हे विमान सौदी अरेबियातील ताबूक येथे सुखरूप आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय तपासात काय समोर आले?
या घटनेनंतर संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि ओमानमधील नागरी विमान वाहतूक व गुप्तचर यंत्रणांनी संयुक्त तपास सुरू केला असून यात अमेरिकेचीही मदत घेतली जात आहे. प्राथमिक तपासादरम्यान, सहवैमानिकाने विमान जाणीवपूर्वक पाडण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. मात्र, तो कोणत्याही परदेशी दहशतवादी संघटनेच्या थेट आदेशावर काम करत होता, याबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
सहवैमानिकाच्या नियुक्ती प्रक्रियेवर प्रश्न
तपासात सहवैमानिकाच्या पार्श्वभूमीची तपासणी आणि देशांदरम्यान सुरक्षा माहितीची देवाणघेवाण यांतील संभाव्य त्रुटींचाही मुद्दा उपस्थित झाला आहे. ओमान एअरने अतिरेकी विचारसरणीबाबतच्या चिंतेमुळे त्याला यापूर्वी उड्डाणाच्या कामातून काढले होते, असा प्राथमिक तपासातील दावा आहे. मात्र, ही माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर का पोहोचली नाही आणि फ्लायदुबईमध्ये नोकरी मिळवताना ती कशी समोर आली नाही, याबाबत तपास सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धैर्याची दखल घेत इस्रायलने त्यांना नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
