पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८० स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. यंदाच्या सोहळ्याला आणखी एक विशेष महत्त्व होते. ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्याचे गायन करण्यात आले. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांच्या जवळ उभ्या असलेला एक महिला लष्करी अधिकाऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ध्वजारोहणाच्या वेळी त्यांची उपस्थिती पाहून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. कॅप्टन सोनिया सिंह चौहान असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

कोण आहेत कॅप्टन सोनिया सिंह चौहान?

कॅप्टन सोनिया सिंह चौहान या भारतीय लष्करातील कमिशन्ड अधिकारी आहेत. यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात त्यांच्यावर विशेष औपचारिक जबाबदारी सोपवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या तपशीलानुसार, कॅप्टन सोनिया सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाल किल्ल्याच्या तटबंदीवर राष्ट्रध्वज फडकवताना सहाकार्य केले.

लाल किल्ल्यावर नेमकी काय होती जबाबदारी?

स्वातंत्र्यदिनाचा लाल किल्ल्यावरील सोहळा अत्यंत काटेकोर लष्करी प्रोटोकॉलनुसार पार पडतो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या लष्करी अधिकाऱ्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या दिल्या जातात. कॅप्टन चौहान यांची जबाबदारी राष्ट्रध्वज फडकवण्याच्या महत्त्वपूर्ण क्षणी पंतप्रधानांना थेट सहाय्य करण्याची होती. ध्वजारोहणाचा कार्यक्रम २१ तोफांची सलामी आणि इतर लष्करी प्रोटोकॉलशी समन्वयित करण्यात आला होता.

सोशल मीडियावर एवढी चर्चा का?

पंतप्रधानांच्या जवळ कॅप्टन चौहान दिसल्याने त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. विशेषतः भारतीय लष्करातील महिला अधिकाऱ्यांची वाढती भूमिका आणि नारी शक्तीवर दिला जाणारा भर यामुळेही त्यांच्या उपस्थितीने लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांत भारतीय सशस्त्र दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांना विविध महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक जबाबदाऱ्या मिळत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यदिनासारख्या देशव्यापी महत्त्वाच्या सोहळ्यात एका महिला लष्करी अधिकाऱ्याची अशी प्रमुख भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली.

मात्र, वैयक्तिक माहिती अद्याप मर्यादित

कॅप्टन सोनिया सिंह चौहान यांच्याबद्दल ऑनलाइन विविध दावे केले जात असले तरी त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीविषयी अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यांचे मूळ राज्य, रेजिमेंट किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित तपशील अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. त्यांनी स्वतः माध्यमांशी याबाबत कोणतीही सार्वजनिक चर्चा केलेली नाही.