जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्य़ातील एका जंगलात दहशतवाद्यांनी रविवारी लष्कर व पोलीस यांच्या संयुक्त शोधपथकावर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत, अटक करण्यात आलेला एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला, तर सुरक्षा दलांचे ३ जवान जखमी झाले.

व्यापक शोधमोहीम सुरू असलेल्या मेंढरच्या भट्टा दुरियाँ जंगलात, तसेच लगतच्या सूरनकोट (पूंछ) येथील जंगलात आणि राजौरी जिल्ह्य़ातील थानामंडी येथे जोरदार गोळीबार आणि स्फोट झाल्याचे वृत्त आहे.

या शोधमोहिमेचा रविवारी १४वा दिवस होता. या मोहिमेत सूरनकोट व मेंढर येथे अनुक्रमे ११ व १४ ऑक्टोबरला वेगवेगळ्या चकमकींत लष्कराचे ९ जवान शहीद झाले होते.

भट्टा दुरियाँ जंगलात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस, लष्कराचा एक जवान, तसेच लष्कराच्या ताब्यात असलेला लष्कर-ए-तैयबाशी संलग्न पाकिस्तानी दहशतवादी झिया मुस्तफा हे ४ जण जखमी झाले. कैदी मुस्तफा याला दहशतवाद्यांचा अड्डा दाखवण्यासाठी या जंगलात नेण्यात आले होते. शोधमोहिमेदरम्यान पथक या अड्डय़ाजवळ पोहचले असता दहशतवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. जखमी मुस्तफा नंतर मरण पावला आणि जोरदार गोळीबारामुळे त्याला जंगलाबाहेर नेता येऊ शकले नाही. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटचा रहिवासी असलेल्या मुस्तफा याला गेली १४ वर्षे कोट भलवाल कारागृहात ठेवण्यात आले होते. लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी त्याचा संबंध असल्याचे आढळल्यानंतर त्याला पोलीस रिमांडवर मेंढरला हलवण्यात आले होते.