जशपूर : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्य़ातील पत्थलगाव येथे शुक्रवारी दुपारी काढण्यात आलेल्या एका धार्मिक मिरवणुकीत एक एसयूव्ही घुसल्याने एक तरुण ठार, तर १६ जण जखमी झाले.

बाजारपुरा वस्तीतील नागरिकांनी दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढली असता ही घटना घडल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मरण पावलेल्या तरुणाचे नाव गौरव अग्रवाल (२१) असे आहे.

वाहनात असलेल्या बबलू विश्वकर्मा (२१) व शिशुपाल साहु (२६) यांना नंतर शहराच्या सीमेवर अटक करण्यात आली. हे दोघेही शेजारच्या सिंगरौली येथील रहिवासी आहेत. हे वाहन जळत असल्याचे आढळले. हे दोघे गांजाची तस्करी करत होते आणि त्यांचा पाठलाग करण्यात येत असल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वत:च एसयूव्ही पेटवून दिली, असा दावा स्थानिकांनी केला.

या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला आणि लोक मोठय़ा संख्येत पत्थलगाव पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाले.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या घटनेचे वर्णन ‘दुर्दैवी आणि हृदयद्रावक’ असे केले. आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, सकृद्दर्शनी दोषी आढळलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ‘याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. कुणाचीही गय केली जाणार नाही. सर्वाना न्याय मिळेल,’ असे ट्वीट बघेल यांनी हिंदीत केले.