पाकिस्तानी नौसैनिकांनी रविवारी गुजरातमधील द्वारका येथील सागरी भागात भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला. या घटनेत महाराष्ट्रातील एका मच्छिमाराचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवीबंदर पोलिसांनी पाकिस्तान सागरी सुरक्षा एजन्सी (PMSA) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या एफआयआरमध्ये, भारतीय मच्छिमारांवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या दोन बोटींमध्ये उपस्थित असलेल्या १० लोकांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३०२, ३०७, ११४, २५ (१)अ, ३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा कर्मचार्‍यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ दोन भारतीय मासेमारी नौकांवर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या दिलीप नातू सोळंकी या मच्छिमाराच्या वतीने एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ठाणे येथील श्रीधर रमेश चामरे हे (३२ वर्ष) या मच्छिमाराचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर एक जखमी झाल्याची माहिती आहे.

पाकिस्तानी सागरी सुरक्षा  कर्मचार्‍यांनी  शनिवारी भारतीय मच्छिमारांच्या जलपरीच्या बोटीला वेढा घातला आणि गोळीबार सुरू केला. गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील ओखा नदीच्या किनारी ही घटना घडली आहे.