माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी आणि इतर १२ जणांविरोधात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीतील घोटाळाप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी गुन्हे दाखल केले. त्यांच्यावर फसवणूक आणि फौजदारी कटाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. भ्रष्टाचाराच्या तसेच फौजदारी गुन्ह्य़ाबद्दल खटला दाखल होणारे त्यागी हे पहिलेच माजी हवाई दलप्रमुख आहेत.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ३६०० कोटी रुपयांची हेलिकॉप्टर खरेदी प्रस्तावित आहे. या व्यवहारात लाचखोरी झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यात येत असून, आता गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. माजी केंद्रीय मंत्री संतोष बग्रोडिया यांचे भाऊ सतीश बग्रोडिया आणि प्रताप अग्रवाल ही दोन नावे या प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आली असून, त्यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सर्व आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसारही आरोप ठेवण्यात आले आहेत. प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या १२ पथकांनी बुधवारी दिल्ली तसेच चंदिगढमध्ये १४ ठिकाणी छापे घातले. यामध्ये त्यागी यांच्या निवासस्थानावरील छाप्याचा तसेच फिनमेकॅनिका, ऑगस्टावेस्टलँड, आयडीएस इन्फोटेक आणि एरोमॅट्रिक्स या कंपन्यांच्या कार्यालयांवरील छाप्यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील संशयित दलाल कालरे गॅरोसा, ख्रिस्तिआन मिशेल, गायडो हॅशक, वकील गौतम खैतान, एरोमॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गिसेपी ओरसी, ऑगस्टावेस्टलँडचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुनो स्पॅगोलिनी तसेच त्यागी यांचे पुतणे यांची नावे प्राथमिक माहिती अहवालात नोंदविण्यात आली आहेत. ऑगष्टावेस्टलँडला खरेदीचे कंत्राट मिळावे म्हणून ३६२ कोटी रुपयांची लाच देण्यात आल्याचा संशय आहे.
इटलीहून मिळालेली कागदपत्रे आणि संरक्षण खात्याने उपलब्ध केलेली माहिती सीबीआयच्या ताब्यात आहेत. हेलिकॉप्टर खरेदीसाठीच्या निर्धारित अटींमध्ये ऑगस्टावेस्टलँडला अनुकूल ठरेल, अशा पद्धतीने फेरफार करण्यात आले, त्यासाठी कट आखण्यात आला, असे या कागदपत्रांतून सूचित होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.