सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : २१ महिला, दोन मुलांसह ३६ जण मृत्युमुखी
पीटीआय, इंदूर : Indore well accident case मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका मंदिराच्या पुरातन विहिरीवरील (बारव) छत कोसळून ३६ भाविकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शुक्रवारी मंदिराच्या दोन विश्वस्तांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. येथील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या दिवशी हवन-पूजन सुरू असताना हा अपघात घडला. त्यात २१ महिला व दोन लहान मुलांसह ३६ जणांचा मृत्यू झाला.
बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सेवाराम गलानी आणि सचिव मुरलीकुमार सबनानी यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर विहिरीवर छत टाकून असुरक्षित बांधकाम केल्याचा आरोप आहे, इंदूर महापालिकेने मंदिर संकुलातील हे अवैध बांधकाम हटवण्याचे आदेश विश्वस्त मंडळाला दिले होते, परंतु विश्वस्त मंडळाने तसे करण्याचे आश्वासन देऊनही त्याचे पालन केले नाही. या दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
अतिक्रमणाची संपूर्ण माहिती असतानाही महापालिका अधिकाऱ्यांनी हे बांधकाम वेळीच न हटवता या भीषण दुर्घटनेस आमंत्रण दिले. त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी रहिवासी अवनीश जैन यांनी केली. सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच महापालिकेने दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली. महसूल आयुक्त पवनकुमार शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले, की अपघातानंतर बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. आतापर्यंत ३६ जणांचे मृतदेह या विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.
मृतांचे देहदान
या दुर्घटनेत मृत पावलेल्या ८ भाविकांच्या कुटुंबीयांनी मृतांचे देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही त्यांनी या प्रसंगी दाखवलेल्या सामाजिक जाणिवेची प्रशंसा केली जात आहे. या मृतांचे डोळे आणि त्वचा दान केली जाणार आहे अशी माहिती मुस्कान ग्रुप या स्वयंसेवी संस्थेन दिली.