Caste Census Questions List Out: जातनिहाय जनगणना हा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला होता. यंदाच्या जनगणनेमध्ये जातीबाबतचीही माहिती समाविष्ट केली जावी, याबाबत संसदेपासून स्थानिक स्तरावरच्या राजकीय नेतेमंमडळींमध्ये चर्चा झडल्याचं पाहायला मिळालं होतं. यासंदर्भात आता केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामध्ये जनगणना अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने ४० मुद्द्यांची यादी दिली असून त्यासंदर्भातली माहिती यंदाच्या जनगणनेमध्ये गोळा केली जाणार आहे. या यादीमध्ये नागरिकांच्या वैयक्तिक माहितीसोबतच जात, धर्म, भाषा, शिक्षण अशा अनेक मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. जनगणना करणारे कर्मचारी यासंदर्भातले प्रश्न नागरिकांना विचारून त्यांची माहिती गोळा करणार आहेत.

कोणत्या मुद्द्यांचा यंदाच्या जनगणनेत समावेश?

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण ४० मुद्द्यांचा या यादीत समावेश आहे. त्यात व्यक्तीचं नाव, कुटुंबप्रमुखाशी नातं, लिंग, जन्मतारीख, वय, वैवाहिक स्थिती, राष्ट्रीयत्व, धर्म, जात, मातृभाषा व इतर माहिती असलेल्या भाषा अशा मुद्द्यांचा समावेश आहे. त्यायशिवाय, साक्षरता, डिजिटल साक्षरता, शैक्षणिक उपस्थिती, सर्वाधिक शिक्षण, रोजगाराची स्थिती, घर, उद्योग, कर्मचाऱ्यांची स्थिती व स्थलांतराबाबतच्या माहितीसंदर्भातही प्रश्न विचारले जाणार आहेत.

याव्यतिरिक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आई-वडिलांची माहिती, दिव्यंगत्व, जन्माचं ठिकाण, याआधी वास्तव्य करत असलेले ठिकाण, तिथून स्थलांतर करण्याचे कारण, स्थलांतर करून आलेल्या ठिकाणी किती काळ वास्तव्य आहे अशा प्रश्नांचादेखील या ४० मुद्द्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत काय?

यासंदर्भात जनगणना आयुक्त मृत्यूंजय कुमार नारायण यांनी शुक्रवारी १४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये जनगणनेचा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे.

“जनगणना कायद्याच्या कलम ८ अन्वये, निवडणूक अधिकाऱ्यांना त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या क्षेत्रातील सर्व व्यक्तींना सदर अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जनगणना २०२७ च्या अनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत”, असं या अधिसूचनेत म्हटलं आहे.

कुटुंबातील सदस्यांचीही माहिती घेतली जाणार

दरम्यान, जनगणनेदरम्यान नागरिकांच्या जातीबाबतच्या माहितीबरोबरच महिला, कुटुंबातील मुलांची संख्या, गेल्या वर्षभरात जन्माला आलेली मुले अशी माहितीदेखील विचारली जाणार आहे. याव्यतिरिक्त, बँक खात्याची माहिती, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र क्रमांक, पासपोर्ट क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स अशा अधिकृत कागदपत्रांचीदेखील माहिती घेतली जाणार आहे. त्याचबरोबर, कोविड-१९ ची लस कोणत्या ठिकाणी घेतली? याबाबतही जनगणनेमध्ये प्रश्न विचारण्यात येणार आहेत.