‘जय श्रीराम’ म्हणत जमावाने केली कॅथलिक शाळेची तोडफोड; बजरंग दलाचे चार जण ताब्यात

१५०० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून त्यापैकी बहुतांश जण हिंदू आहेत.

catholic-schhol-attack-MP
या गोंधळामुळे शाळेच्या इमारतीच्या काही काचा फुटल्या. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी मध्यप्रदेशातल्या एका कॅथलिक शाळेवर दगडफेक केली. शाळेच्या पदाधिकाऱ्यांवर या कार्यकर्त्यांनी धर्मांतराचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घडल्या प्रकारासंदर्भात चार जणांना ताब्यात घेतलं असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने इतरांनाही शोधण्याचं काम सुरू आहे.

मध्यप्रदेशातल्या विदिशा जिल्ह्यातल्या गंज बसोडा इथल्या सेंट जोसेफ शाळेत हा प्रकार घडला. सोमवारी दुपारी साधारण बारा-साडेबारा दरम्यान ३०० लोक या शाळेच्या बाहेर जमा झाले आणि आंदोलन करु लागले. यावेळी शाळेत १२वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होती. काही काळातच हा जमाव आक्रमक झाला आणि शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली. शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी टायन्युमकल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की या जमावाक़डे लोखंडी सळया आणि दगड होते, ते शाळेवर फेकताना हा जमाव ‘जय श्रीराम’ म्हणत होता.

पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ब्रदर अँथनी म्हणाले, आम्ही पोलिसांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. मात्र त्यांना आम्हाला ही खात्री दिली की हा जमाव फक्त थोडी घोषणाबाजी करेल आणि मग शांततेत निघून जाईल. त्यानंतरही आम्ही पोलीस संरक्षण देऊ असं ते म्हणाले होते. मात्र सगळा जमाव तोडफोड करुन निघून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

ब्रदर अँथनी यांचे हे आरोप फेटाळत गंज बसोडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भरत भूषण म्हणाले, हे शांततापूर्ण आंदोलन होतं. पण काही समाजकंटकांनी या संधीचा फायदा घेत शाळेवर दगडफेक केली. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या काही काचा फुटल्या. शाळेला पोलीस संरक्षण देण्यात आलं असून आरोपींवर कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. बजरंग दलाच्या चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

ही शाळा ११ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. भोपाळच्या मलाबार मिशनरी सोसायटीकडून ही शाळा चालवली जाते. १५०० विद्यार्थी इथं शिक्षण घेत असून त्यापैकी बहुतांश जण हिंदू आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे नेते निलेश अग्रवाल ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं, ते म्हणाले, माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी या शाळेतल्या आठ मुलींचं धर्मांतर करण्यात आलं होतं. बालहक्क संरक्षणासाठीच्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष पिर्यांक कनुगो यांनी या प्रश्नाबद्दल विदिशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रही लिहिलं होतं. मात्र अग्रवाल यांचे हे आरोप शाळेचे मुख्याध्यापक ब्रदर अँथनी यांनी फेटाळले आहेत. तर पोलीस अधिकारी भूषण यांनीही शाळेवरचे धर्मांतराचे आरोप फेटाळले असून ही माहिती खोटी असल्याचं स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Catholic school in madhya pradesh vandalised by hindu groups vsk

Next Story
पगारावर १८ टक्के GST: “सरकारच्या तिजोरीत भर पडली पाहिजे हे खरे, पण त्यासाठी…”; शिवसेनेनं केंद्रावर साधला निशाणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी