दिल्लीच्या सीमेजवळ मागील काही आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनामुळे पंजाब आणि हरयाणामध्ये शेतमालाचे भाव गडगडले आहेत. अमृतसरसहीत दिल्लीला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतमालाला भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच अनेक शेतकरी आपल्या शेतात आलेलं पीक अगदी नाममात्र किंमतीला विकण्याऐवजी शेतमाल असलेल्या शेतजमीनी नांगरत आहेत. गहू आणि इतर धान्याला ज्याप्रमाणे किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइस) दिली जाते तशी या पिकांनाही देण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सराई गावातील अजित सिंग या शेतकऱ्याने पिकवलेल्या फ्लॉवरला एक रुपये प्रति किलोपेक्षा कमी किंमत मिळाली. त्यामुळेच संतापलेल्या अजित सिंग यांनी एक एकरच्या शेतातील फ्लॉवरच्या पिकावर थेट नांगर फिरवला.

अजित यांनी बियाणे खरेदी, खतं, औषधं वगैरेंसाठी एकूण ३५ ते ४० हजार रुपये खर्च केले होते. या पिकामध्ये आपल्याला एक लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती, असं अजित यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं. “मागील वर्षी फ्लॉवरला ११ ते १४ रुपये दर मिळाला. मात्र आता मला घाऊक बाजारपेठेमध्ये एक रुपया प्रति किलोपेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे पीक काढून ते बाजारात घेऊन जाणंही तोट्याचं आहे. म्हणूनच मी त्यावर नांगर चालवण्याचा निर्णय घेतला,” असं अजित म्हणाले. शेतमालाचे ट्रक दिल्लीत जाऊ शकत नसल्यानेच शेतमालाच्या किंमती गडगडल्याचे अजित सिंग सांगतात. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीरमधूनही शेतमालाला फारशी मागणी नसल्याचे अजित सांगतात.

अजित यांच्याप्रमाणेच सतनाम सिंग यांनीही ३० किलोची फ्लॉवर घाऊक बाजारपेठेमध्ये केवळ २२ रुपयांना विकली. मला प्रति किलो ७५ पैसे असा दर मिळाला. मात्र उत्पादन शुल्क हे प्रति किलो दोन रुपये इतकं होतं, असं सतनाम सांगतात. सरकार शेतकऱ्यांना केवळ गव्हाचं पिक घेण्याऐवजी भाज्या पिकवण्याचा सल्ला देतं. मात्र त्यांनी भाज्यांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केलेली नाही. आज भाज्यांनाही किमान आधारभूत किंमत मिळत असती तर आमची निराशा झाली नसती असं अजित सिंग सांगतात.

फळं आणि भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चरणजीत सिंग बत्रा यांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, जैयपूरला अमृतसरमधून होणाऱ्या शेतमालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले. रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याने शेतमाल पोहचत नसल्याचं बत्रा म्हणाले. ग्रामीण भागांमधून अगदी मोजके टक आझादपूर बाजारात पोहचत आहेत, असं बत्रा म्हणाले.