माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम याच्या अडचणीत वाढ झाली आहे. कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीयाला सीबीआयने अटक केली आहे. व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी ही मोठी अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयने रात्री उशिरा कार्ती चिदंबरम यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणला अटक केली. याच प्रकरणात सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे टाकले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी सीबीआयने देशभरात चिदंबरम यांच्या सात ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यानंतर चिदंबरम यांनी ट्विट केले होते की या काळात तपास यंत्रणेला काहीही मिळाले नाही. या कालावधीत सीबीआयने दाखवलेल्या कागदपत्रात आरोपी म्हणून आपले नाव नसल्याचेही त्यांनी लिहिले आहे. दुसरीकडे, सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार हे प्रकरण २०११ चे आहे. पी चिदंबरम त्यावेळी गृहमंत्री होते. शेडोंग इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या चिनी कंपनीला पंजाबमधील मानसा येथे पॉवर प्लांट बांधण्यासाठी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडकडून कंत्राट मिळाले होते.

पॉवर प्लांटच्या बांधकामात होणारा विलंब आणि वेळेवर काम पूर्ण न केल्याने मोठा दंड टाळण्यासाठी अतिरिक्त चिनी तज्ज्ञ आणण्याची सेप्कोला नितांत गरज होती. परंतु गृह मंत्रालयाने मर्यादित संख्येने व्हिसा जारी केल्यामुळे सेप्को तज्ज्ञ आणू शकले नाही. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, टीएसपीएलचे उपाध्यक्ष विकास मखरिया यांनी पी चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांच्याशी संपर्क साधला. भास्कर रमन यांनी ५० लाखांच्या मोबदल्यात काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर चिनी कंपनीच्या २६३ तज्ज्ञांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली. यानंतर मुंबईतील बेल टूल्स लिमिटेड या कंपनीला बनावट पावत्यांद्वारे ५० लाख रुपये पाठवण्यात आले आणि तेथून ही रक्कम भास्कर रमन आणि कार्ती चिदंबरम यांच्यापर्यंत पोहोचली. कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात भक्कम इलेक्ट्रॉनिक आणि इतर पुरावे असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi arrest karti chidambarm close aide bhaskar raman rmt
First published on: 18-05-2022 at 12:21 IST