अभिनेत्री-मॉडेल त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणाची मागील काही दिवसांपासून देशभरात चर्चा सुरू आहे. १२ मे रोजी त्विशा शर्माचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला होता. या घटनेला तिच्या सासरकडच्या कुटुंबियांनी आत्महत्या म्हटलं होतं, तर तिच्या माहेरकडील कुटुंबियांनी सासरकडील लोकांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत असून दररोज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचलं आहे. त्विशा शर्माच्या सासू गिरीबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यामुळे त्या या घटनेच्या तपासावर प्रभाव टाकत असल्याचा आरोप त्विशा शर्माच्या आई-वडिलांनी केला होता. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह यांची तब्बल ६ तास चौकशी केली. ६ तासांच्या चौकशीनंतर अखेर गिरीबाला सिंह यांना सीबीआयने गुरुवारी दुपारी अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर कारवाई
त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात त्विशा शर्माच्या सासू गिरीबाला सिंह यांना भोपाळच्या सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने बुधवारी गिरीबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला.
उच्च न्यायालयाने गिरीबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द करताच सीबीआयने आज (२८ मे) मोठी कारवाई केली. त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सीबीआयने गिरीबाला सिंह यांची तब्बल ६ तास चौकशी केली. या ६ तासांच्या चौकशीनंतर गिरीबाला यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

त्विशा शर्माच्या वडिलांनी मानले उच्च न्यायालयाचे आभार
त्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणात सासू गिरीबाला सिंह यांना सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने गिरीबाला यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला. गिरीबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर पीडितेचे वडील नवनिधी शर्मा यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, “न्यायासाठीच्या या लढ्यात आतापर्यंत आमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.”
त्विशा शर्माचा पतीही अटकेत
त्विशा शर्माच्या मृत्यूनंतर १० दिवस गायब असलेला समर्थ सिंह यालाही अटक करण्यात आली असून तो कोठडीत आहे. तसेच १२ मेच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? याबाबत समर्थने पोलिसांना आपल्या जबाबात माहिती दिली. समर्थने पोलिसांना अशी माहिती दिली की, एप्रिल महिन्यात आम्हाला दोघांनाही बंगळुरुला जायचं होतं. पण ऐनवेळी त्विशाने बंगळुरुला जाण्यास नकार दिला. तिने सांगितलं मला माझ्या भावाकडे म्हणजेच अजमेर या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर मी एकटा बंगळुरुला गेलो, तर त्विशा अजमेरला निघून गेली. पण मला नंतर हे समजलं की त्विशा फक्त एक दिवसासाठी अजमेरला गेली होती त्यानंतर ती दिल्लीला गेली. तू मला न सांगता दिल्लीला का गेलीस? असं विचारलं तेव्हा त्विशा आणि माझा वाद झाला होता अशी माहिती समर्थने पोलिसांना दिली. १७ एप्रिलला त्विशाला कळलं की ती गरोदर आहे, त्यानंतर तिचं वागणं बदलून गेलं होतं. त्विशा मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात होती. ती कायम मला सांगायची की मी एखाद्या घरी राहणाऱ्या महिलेप्रमाणे आयुष्य घालवू शकत नाही. यावरुनच तिच्यात आणि माझ्यात खटके उडू लागले होते असंही समर्थने पोलिसांना सांगितलं.

त्विशा शर्मा कोण होती?
दरम्यान, त्विशा शर्मा ही मूळची नोएडाची होती, तिने २००९ ते २०१२ दरम्यान मॉडलिंग क्षेत्रात प्रेवश केला. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिस पुणे सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. मिस पुणे स्पर्धा जिंकणं हा त्विशाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पाँइंट होता. कारण, यानंतरच तिच्यासाठी जाहिरात, मॉडलिंग आणि अभिनयाची दारे खुली झाली. त्विशाने व्यावसायिक जाहिरांतीमध्येही काम केलं आहे. तसंच तेलगू चित्रपटांतूनही ती झळकली. ‘मुग्गुरु मोनागल्लू’हा तिचा पहिला तेलगू चित्रपट होता. तर, २०१८ मध्ये तिने ‘जरा संभल के’ नावाच्या लघुपटातही काम केलं होतं. त्विशाबरोबर काम करणाऱ्या अनेक सहकलाकारांनी तिच्या कामाचं कौतुकच केलं होतं.
नेमकं प्रकरण काय आहे?
३३ वर्षीय त्विशा शर्माचा विवाह निवृत्त जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांचे सुपुत्र समर्थ सिंह याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यांच्या आत १२ मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स भागातील तिच्या सासरच्या घरी त्विशाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन (Postmortem) अहवालात त्विशाचा मृत्यू फाशी लागल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्विशाच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा मामला नसून हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे.
