नौदलाच्या किलो क्लास पाणबुडीच्या अपग्रेडेशनची गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने नौदलातील एक सेवारत अधिकारी आणि दोन सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना अटक केली आहे. या तीन अधिकाऱ्यांच्या अटकेशिवाय या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता आहे. तसेच माहिती लीक करण्यामध्ये परदेशी गुप्तचर संस्थांचा सहभाग होता की नाही हे अद्याप अस्पष्ट असल्याचं म्हटलं जातंय. या प्रकरणाचा तपास व्हाईस अॅडमिरल आणि रिअर अॅडमिरलकडून केला जात आहे, असा पुष्टी नौदलाच्या सूत्रांनी केली आहे.

गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप असलेला अधिकारी मुंबईचा असून तो नौदलात कमांडर पदावर आहे. किलो क्लास पाणबुड्या, सोव्हिएत युनियनमध्ये सोव्हिएत नौदलासाठी डिझाइन केलेल्या आणि बांधलेल्या, जगातील सर्वात सामान्य पारंपारिक पाणबुड्यांपैकी आहेत आणि सध्या अनेक देशांच्या नौदलात सेवेत आहेत. भारतात या पाणबुड्यांचे सिंधुघोष वर्गात वर्गीकरण केले जाते. आजपर्यंत, सरकारने अशा १० पाणबुड्या विकत घेतल्या आहेत, त्या सर्वांचे गरजेनुसार अपग्रेडेशन आणि आधुनिकीकरण झाले आहे.

सेवेवर असणारा नौदलातील अधिकारी मुंबईत कर्तव्यावर असून तेथून त्याला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. तसेच माहिती लीक झाल्याची घटना मात्र दिल्लीत घडली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेले नौदलाचे अधिकारी माहिती लीक करण्याच्या इतर प्रकरणांमध्ये अटक केलेल्यांपैकी सर्वात वरिष्ठ असू शकतात, असंदेखील सूत्रांनी सांगितलं.