गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून देशात नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत जवळपास १३ आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुढील चौकशी सुरू आहे. पेपर फुटीच्या प्रकरणावरून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

नीटची ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली होती आणि त्यानंतर २१ जून २०२६ रोजी पुन्हा ही परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. यातच आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे, या तपासादरम्यान अशी माहिती समोर आली की ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेसाठी छापण्यात आलेल्या आणि परीक्षा केंद्रांवर वितरित करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांच्या दोन संचाला ‘कैलास’ आणि ‘शिवालिक’ अशी पर्वतशिखरांची सांकेतिक नावं देण्यात आली होती. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्स्प्रसने दिलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात ७७ दिवसांत तपास पूर्ण करत सीबीआयने मंगळवारी दिल्लीतील एका फास्ट-ट्रॅक न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केलं. यावेळी सीबीआयने १३ आरोपींची नावं यात नमूद केली आहेत. तसेच तपासाचा भाग म्हणून सीबीआयने एनटीएला प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी अवलंबलेल्या प्रक्रियेबद्दल स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं. तेव्हा एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचे चार मास्टर संच तयार करण्यात येतात आणि प्रत्येक संचामध्ये १८० प्रश्न असतात, जे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये समान प्रमाणात विभागलेले असतात.

एनटीएच्या अधिकाऱ्यांनी तपासकर्त्यांना सांगितलं की, या चार संचांपैकी दोन संच ‘प्रशासकीय संच’ म्हणून निश्चित केले जातात आणि हे संच आवश्यक त्या संख्येने छापले जातात आणि परीक्षा केंद्रांवर वितरीत केले जातात. सूत्रांनी सांगितलं की, “नीट यूजी-२०२६ साठी या दोन प्रशासकीय संचांना ‘कैलास’ आणि ‘शिवालिक’ अशी सांकेतिक नावे देण्यात आली होती. उर्वरित दोन संच ‘बिगर-प्रशासकीय संच’ मानले जातात आणि परीक्षेच्या सामान्य प्रक्रियेत वितरणासाठी त्यांचा वापर केला जात नाही.”