NEET Paper Leak CBI Chargesheet: नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू येथील विशेष सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात सीबीआयने एनटीए-नियुक्त तीन विषय तज्ज्ञांसह १३ आरोपींची नावे दिली आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात नीट पेपरफुटी सुनियोजित, बहुराज्यीय गुन्हेगारी कट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विषय तज्ज्ञांनी प्रश्नपत्रिका फोडल्या आणि मध्यस्थांच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या असा आरोप सीबीआयने केला आहे.
आरोपपत्रात तीन विषय तज्ज्ञांची नावे
सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात तीन विषय तज्ज्ञांची नावे आहेत. याममध्ये वनस्पतीशास्त्र विषयाच्या मनिषा गुरुनाथ मांढरे, रसायनशास्त्राच्या प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि भौतिकशास्त्राच्या मनिषा संजय हवालदार यांच्या नावाचा समावेश आहे. या तिघांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या तिघांच्या मार्फेत प्रश्नपत्रिका कोचिंग चालक आणि मध्यस्थांकडे सोपविण्यात आल्या आणि तिथून पुढे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.
आरोपपत्रात कोणाची नावे?
नीट पेपरफुटीप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विषय तज्ज्ञ, कोचिंग क्लासेसचे चालक आणि मध्यस्थी यांचे मोठे जाळे असून, यांच्याकरवी पैशांसाठी पेपरफुटी झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. एनटीएचे विषय तज्ज्ञ यांच्याशिवाय आरोपपत्रात तेजस शाह, शिवराज मोटेगांवकर, डॉ. मनोज शिरुरे, मनिषा संजय वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मांगिलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल यांचा समावेश आहे.

पैशांसाठी फोडल्या प्रश्नपत्रिका
पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या प्रत्येकाने प्रश्नपत्रिका फोडण्यासाठी काम केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. यामुळे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आणि पैशांची देवाणघेवाण करणे यांचा समावेश आहे. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. फाईल्स शेअर करण्यासाठी टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि इतर मेसेजिंग अॅपचा वापर करण्यात आला आहे. आरोपींनी डिजिटल माध्यमांचा केलेला वापर यामुळे तपास करणे सोपे गेल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
