‘पीएनबी’ फसवणूक प्रकरण : कालराचे भारतात प्रत्यार्पण

कालरा याने गुप्तपणे माल हलविल्याने बँकेला त्याला दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करणे अशक्य झाले  होते.

नवी दिल्ली : सुमारे १० कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी सनी कालरा याला सीबीआयने शनिवारी मस्कतमधून भारतात आणले. सीबीआयने २०१६ मध्ये इंटरपोलला रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली होती, त्यानुसार कालरा याचे प्रत्यार्पण करण्यात आले.

कालरा हा व्हाइट टायगर स्टील्स प्रा. लि. या कंपनीचा संचालक असून त्याने पंजाब नॅशनल बँकेकडून (पीएनबी) १० कोटी रुपयांचे कर्ज घतले होते आणि त्याचा परतावा केला नाही, असा त्याच्यावर आरोप आहे.

कालरा याने गुप्तपणे माल हलविल्याने बँकेला त्याला दिलेल्या कर्जाची रक्कम वसूल करणे अशक्य झाले  होते. कालरा, त्याची पत्नी आणि अन्य आरोपी यांच्याबाबतचे प्रकरण १६ डिसेंबर २०१५ मध्ये सीबीआयने हाती घेतले होते.

एफआयआर नोंदविण्यात आल्यापासून कालरा आणि त्याची पत्नी फरार झाले होते. सीबीआयने प्रकरण हाती घेतल्यानंतर २२ डिसेंबर २०१६ रोजी कालरा, त्याची पत्नी आणि पीएनबीच्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. तत्कालीन मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि बँकेचा एजीएम हे बँकेचे तीन अधिकारी आहेत.

सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने ३१ मे २०१६ रोजी कालराविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली. त्यानंतर तो मस्कतमध्ये असल्याचे कळले. तेथे त्याला स्थानिक यंत्रणांनी पकडले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Cbi extradites sunny kalra from oman on rs 10 cr pnb fraud case zws