जागतिक माफिया छोटा राजन याला न्यायालयाने बनावट पारपत्र (पासपोर्ट) प्रकरणात दहा दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. काल सकाळी त्याला इंडोनेशियातील बाली येथून नवी दिल्ली येथे आणले होते. गेली २७ वर्षे तो सापडत नव्हता अखेर तो हाती आला आहे. त्याचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असून त्याला सीबीआय मुख्य इमारतीत झालेल्या सुनावणीत सीबीआय कोठडी देण्यात आली. राजनच्या सुरक्षेचा धोका असल्याने ही सुनावणी सीबीआय मुख्य न्यायालयात घेण्यात आली.

सीबीआय प्रवक्तयाने सांगितले, की राजन आता सीबीआयच्या ताब्यात आहे. राजन हा एके काळी दाऊदचा साथीदार होता पण १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद व राजन यांची फाटाफूट झाली होती. दिल्ली व मुंबई येथे त्याच्यावर खून, खंडणी व अमलीपदार्थ तस्करी असे एकूण ७० आरोप आहेत. शुक्रवारी छोटा राजनला बाली येथून आणल्यानंतर सीबीआय मुख्य इमारतीत नेण्यात आले. त्याचे प्राथमिक जाबजबाब घेण्यात आले आहेत. त्याला येथे आणल्यानंतर इंटरपोलच्या ताब्यात दिले. त्याच्या विरोधात खोटा पासपोर्ट तयार केल्याचा आरोप आहे, मुंबई पोलिसांनी त्याच्याविरोधातील काही गुन्हे तपासासाठी सीबीआयकडे वर्ग केले.

‘डायलिसिसची गरज नाही’
राजन वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असून त्याला ‘डायलिसिस’ची गरज नाही. राजनला बाली येथे २५ ऑक्टोबर रोजी तो ऑस्ट्रेलियातून तेथे आला असता अटक करण्यात आली. नंतर भारताकडे त्याचा ताबा देण्यात आला. बाली येथे भूकंप झाल्याने त्याला आणण्यात बराच विलंब झाला.