अभिनेत्री-मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात सीबीआयने २८ मे रोजी मोठी कारवाई करत सासू गिरीबाला सिंह यांना अटक केली. त्विशा शर्माचा १२ मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला होता. मात्र, या घटनेला त्विशा शर्माच्या सासरच्या कुटुंबियांनी आत्महत्या म्हटलं होतं, तर त्विशाच्या आई-वडिलांनी सासरच्या कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला.

त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात आतापर्यंत त्विशा शर्माच्या पतीलाही अटक झाली असून त्याची रवानगी कोठडीत करण्यात आलेली आहे. त्यानंतर २८ मे रोजी सीबीआयने त्विशाची सासू माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह यांना अटक केली आहे. अटकेनंतर गिरीबाला सिंह यांना भोपाळ जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. तसेच गिरीबाला यांचा मुलगा तथा त्विशाचा पती समर्थ सिंह याचीही कोठडी न्यायालयाने पाच दिवसांसाठी वाढवली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येत असून या प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्विशा शर्माच्या सासू गिरीबाला सिंह या निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या घटनेच्या तपासावर प्रभाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्विशा शर्माच्या आई-वडिलांनी केला होता.

यातच गिरीबाला सिंह यांना भोपाळच्या सत्र न्यायालयाने अंतरिम जामीनही मंजूर केला होता. मात्र, त्यानंतर या विरोधात मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने गिरीबाला सिंह यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला होता. उच्च न्यायालयाने गिरीबाला सिंह यांचा जामीन रद्द करताच सीबीआयने गिरीबाला सिंह यांना अटक करत मोठी कारवाई केली.

त्विशा शर्मा मृत्यू प्रकरण काय आहे?

३३ वर्षीय त्विशा शर्मा ही अभिनेत्री आणि मॉडेल होती. त्विशाचा विवाह निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह यांचे सुपुत्र समर्थ सिंह याच्याशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यांच्या आत १२ मे रोजी भोपाळमधील कटारा हिल्स भागातील तिच्या सासरच्या घरी त्विशाचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. त्यानंतर शवविच्छेदन (Postmortem) अहवालात त्विशाचा मृत्यू फाशीमुळे श्वास गुदमरून झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, त्विशाच्या आई-वडिलांनी ही आत्महत्या नसून हुंड्यासाठी केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.

त्विशा शर्मा कोण होती?

त्विशा शर्मा ही मूळची नोएडाची होती, तिने २००९ ते २०१२ दरम्यान मॉडलिंग क्षेत्रात प्रेवश केला होता. कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिस पुणे सौंदर्य स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. मिस पुणे स्पर्धा जिंकणं हा त्विशाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पाँइंट होता. कारण त्यानंतर तिच्यासाठी जाहिरात, मॉडलिंग आणि अभिनयाची दारे खुली झाली होती. त्विशाने व्यावसायिक जाहिरांतीमध्ये देखील काम केलं होतं. तसंच तेलगू चित्रपटांमध्येही ती झळकली होती. ‘मुग्गुरु मोनागल्लू’हा तिचा पहिला तेलगू चित्रपट होता. तर, २०१८ मध्ये तिने ‘जरा संभल के’ नावाच्या लघुपटातही काम केलं होतं.