अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणले जात असल्यामुळे दिल्लीच्या पालम विमानतळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांनी कालपासूनच फिल्डिंग लावली होती. मात्र, प्रसारमाध्यमांना अक्षरश: गुंगारा देत छोटा राजनला सीबीआयच्या मुख्यालयात नेण्यासाठी पोलिसांकडून एक शक्कल लढविण्यात आली. पोलिसांनी आपल्या हातावर तुरी ठेवल्या आहेत हे प्रसारमाध्यमांना कळेपर्यंत वेळ निघून गेली होती. राजनला घेऊन येणारे विमान पालमच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर सुरूवातीला विमानतळाच्या परिसरातून पांढऱ्या अॅम्बेसिडर गाडीचा समावेश असलेला गाड्यांचा ताफा सीबीआयचे कार्यालय असणाऱ्या लोधी कॉलनीच्या दिशेने निघाला. त्यामुळे राजनची प्रतिक्रिया मिळविण्यासाठी टपून बसलेल्या प्रसारमाध्यमांनी लगेचच गाड्यांच्या या ताफ्याचा पाठलाग सुरू केला. मात्र, लोधी कॉलनीत पोहचल्यानंतर यापैकी एकाही गाडीत छोटा राजन नसल्याचे स्पष्ट झाले. तोपर्यंत विमानतळावरील पोलिसांचे दुसरे पथक अगदी तशाचप्रकारच्या बुलेटफ्रुफ अॅम्बेसिडर गाडीतून छोटा राजनला घेऊन विनासायास सीबीआयच्या मुख्यालयात पोहचले होते. छोटा राजन विमानतळावर आल्यानंतर त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी आणि छबी टिपण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी उसळणार आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होणार, ही गोष्ट ध्यानात घेऊनच अशाप्रकारची व्यवस्था करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, राजनला सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात आल्यामुळे या परिसराला सध्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.




राजनला सीबीआय मुख्यालयात ठेवण्यात आल्यामुळे या परिसराला सध्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.