नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटसारखीच हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून शेकडो लोकांना डिजिटल अटकेच्या जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. सीबीआयने ‘ऑपरेशन चक्र-६’अंतर्गत देशातील १६ राज्यांमध्ये ८० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
या कारवाईसाठी सीबीआयने ६० विशेष पथके तैनात केली होती. सायबर फसवणुकीच्या २००हून अधिक प्रकरणांशी जोडलेल्या या मोहिमेत पोलिसांनी चेन्नई येथून बी. नरेश आणि कोलकाता येथून संजीब साहा या दोन मुख्य आरोपींना अटक केली. हा संपूर्ण घोटाळा सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी शाखेकडून मिळालेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला. त्याच्या आधारे सीबीआयने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला.
फसवणुकीची पद्धत
भामट्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नावाशी साधर्म्य असणारे एक बनावट डोमेन तयार केले होते. ते स्वतःला पोलीस अधिकारी, केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी किंवा न्यायिक अधिकारी असल्याचे सांगून पीडित व्यक्तींशी संपर्क साधत. त्यांना एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून, अटक किंवा कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करत. त्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट संकेतस्थळावर न्यायालयाचे खोटे आदेश, वॉरंट आणि नोटीस यांसारखी बनावट कागदपत्रे अपलोड करत असत. फसवणुकीच्या पैशांचा माग काढणे कठीण व्हावे यासाठी त्यांनी बोगस कंपन्या स्थापन करून इतरांच्या नावावर बँक खाती उघडली होती. या खात्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे २ कोटी रुपयांची बेकायदा आर्थिक व्यवहाक करण्यात आल्याचे सीबीआयने सांगितले.
एपीके फाइलने फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक
अहमदाबाद : बँक, गॅस आणि सरकारी सेवांच्या नावाखाली बनावट ‘एपीके’ फाइल (मोबाइल ॲप्लिकेशन) पाठवून देशभरातील लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या झारखंडमधील एक मोठी सायबर गुन्हेगार टोळी गुजरात पोलिसांनी उघडकीला आणली आहे. अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेने या टोळीचा मुख्य सूत्रधार पूर्णानंद ऊर्फ मुकेश तिवारी याच्यासह विकास दास आणि सीताराम मंडल या तिघांना अटक केली. या टोळीने आतापर्यंत ५४ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी टेलिग्राम बॉटच्या माध्यमातून बनावट बँक केवायसी, गॅस-वीज बिल अपडेट, आरटीओ चलन आणि क्रेडिट कार्डच्या नावाखाली बनावट ‘एपीके’ फाइल तयार करून सायबर गुन्हेगारांना विकायचे. एखाद्या व्यक्तीने ही फाइल मोबाइलमध्ये डाऊनलोड केली, की हे सॉफ्टवेअर त्या व्यक्तीच्या मोबाइलमधील व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर आपोआप फॉरवर्ड व्हायचे. या साखळी पद्धतीमुळे काही दिवसांतच हे बनावट ॲप्स लाखो मोबाइल फोनमध्ये पसरत असत.
त्या माध्यमातून आरोपींना पीडित व्यक्तीच्या मोबाइलचा पूर्ण रिमोट ॲक्सेस मिळायचा, ज्याद्वारे ते बँक खात्याचे युझर आयडी, पासवर्ड, कॉल्स आणि बँकेचे ओटीपी चोरून पैसे पळवायचे. अहमदाबादमधील नरेश सबनानी नावाच्या एका नागरिकाला ‘साबरमती गॅस बिल अपडेट’ करण्याचे आमिष दाखवून ६.६८ लाख रुपयांना गंडा घातल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता.
अटक करण्यात आलेला विकास दास हा सायबर गुन्हेगारांकडून ‘योनो कॅश’चे पिन आणि ओटीपी घेऊन एटीएममधून पैसे काढायचा आणि कमिशन ठेवून उरलेली रोकड मुंबईत तिवारीला द्यायचा, जेणेकरून कोणताही आर्थिक पुरावा उरू नये. तिसरा आरोपी मंडल हा बँक कार्ड्सची व्यवस्था करायचा. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींवर यापूर्वीही झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये सायबर गुन्ह्यांचे गुन्हे दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
