आणखीन एक बँक घोटाळा : आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीने नऊ बँकांना घातला १४०० कोटींचा गंडा

सीबीआयने आठ ठिकाणी छापे घातल्यानंतर दाखल केला गुन्हा

प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सोमवारी दिल्लीतील क्वालिटी लिमिडेट या दुग्धव्यवसायाशी संबंधित कंपनीच्या आठ ठिकाण्यांवर छापे मारले. क्वालिटी वॉल्स आईस्क्रीम्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीतील दिल्लीच्या मुख्य कार्यालयाबरोबरच एकूण आठ ठिकाणी छापे मारण्यात आले. या कंपनीने नऊ बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. या बँकांची कंपनीने १४०० कोटींची फसवणूक करुन आर्थिक घोटाळा केल्याच्या संक्षयावरुन हे छापे टाकण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. या प्रकरणामध्ये सीबीआयने क्वालिटी लिमिटेड कंपनी आणि कंपनीचे संचालक संजय डिंग्रा, सिद्धार्थ गुप्ता, अरुण श्रीवास्तव यांच्याबरोबर अन्य काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

“आमच्याकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये बँक ऑफ इंडियाबरोबरच या कंपनीने कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदरा, आंध्रा बँक, कॉर्परेशन बँक, आयडीबीआय बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनलक्षमी बँक आणि सिंडिकेट बँकेला एकत्रितपणे एक हजार ४०० कोटी ६२ लाखांचा (अंदाजे) गंडा घातला आहे,” असं सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर यांनी सांगितलं.

“बँक फंडांसंदर्भातील व्यवहार, संबंधित पक्षांशी निगडीत फसवणुकीचे व्यवहार, बनावट कागदपत्रे/पावत्या, खात्यांची खोटी माहिती”, कंपनीच्या नावाने संपत्ती दाखवणे अशा वेगवेगळ्या मार्गाने कंपनीने ही फसवणूक केल्याचे गौर यांनी म्हटले आहे.

सोमवारी आठ ठिकाणी छापे टाकून सीबीआयने कागदपत्रं जप्त केली आहेत. छापे टाकण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये दिल्ली, सहारणपूर, बुंदेशहर (उत्तर प्रदेश), अजमेर (राजस्थान,) पवाल (हरयाणा) या ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी असणारी कंपनीची कार्यालये आणि इतर ठिकाणांवर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यावेळी महत्वाची कागदपत्रे आणि इतर दस्तावेज अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला असून संचालकांबरोबरच कंपनीशी संबंधित इतर अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cbi searches against dairy products firm over rs 1400 crore bank fraud scsg

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या