बारावीच्या परीक्षांबाबत CBSE चा अद्याप निर्णय नाही, विद्यार्थी-पालक संभ्रमात!

१०वीच्या परीक्षांपाठोपाठ आता CBSE नं १२वीच्या परीक्षा देखील रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Student Exam
‘करोनापूर्व काळा’तील संग्रहित छायाचित्र

देशभरात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काही राज्यांनी बोर्डाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये फक्त १०वीच्या परीक्षा रद्द करण्यात येऊन १२वीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय बोर्ड असणाऱ्या CBSE नं यासंदर्भात स्वतंत्र भूमिका घेतली आहे. सीबीएसईनं १०वीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, त्यावेळी १२वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं होतं. या परीक्षा नेमक्या कधी होतील? याविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर अर्धा मे महिना उलटूनही अद्याप त्यावर निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

परीक्षा रद्द करण्याची मागणी!

देशभरात करोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनक अशा वेगाने वाढू लागली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील दिवसेंदिवस नवनवे उच्चांक गाठत असताना देशातील आरोग्यव्यवस्थेवर याचा ताण येऊ लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी आणि पालकांकडून १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात अशी मागणी केली होती. मात्र, त्यासंदर्भात CBSE कडून अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद आलेला नाही.

१०वीच्या परीक्षा रद्द

१४ एप्रिल रोजी सीबीएसईनं बोर्डाच्या १०वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे. त्यामुळे देशातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता १०वीसोबतच आता १२वीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली जाऊ लागली आहे. गेल्या वर्षी मार्चपासून देशभरातील शाळा बंदच आहेत. काही शाळांनी करोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, काही विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा शाळा बंद करण्यात आल्या.

महाराष्ट्रात दहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती!

परीक्षा होणार की नाही?

सामान्यपणे सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. त्या करोनाच्या परिस्थितीत ४ मेपर्यंत पुढे ढकलण्या आल्या होत्या. मात्र, नंतर त्या अनिश्चित कालासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे नेमकी परीक्षा होणार की नाही? आणि झाली तर कधी होणार? याविषयी पालकांच्या मनात संभ्रमाची परिस्थिती आहे.

१०वीच्या विद्यार्थ्यांना कसे मिळणार गुण?

१०वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर मुलांना कशा पद्धतीने गुण दिले जातील, याविषयी CBSE नं स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील २० गुण हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर दिले जाणार आहेत. याशिवाय उरलेले ८० गुण हे वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या आधारावर दिले जातील, असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे.

देशातली आजची आकडेवारी

देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cbse 12th exam postponed no decision taken yet amid corona surge in india pmw

ताज्या बातम्या