नवी दिल्ली : ऑनस्क्रीन मार्किंग (ओएसएम) मूल्यांकन प्रक्रियेतील त्रुटींमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आपली चूक मान्य करत या त्रुटी नियंत्रणात आल्या असल्याचे सांगितले. आपल्या सेवा पुरवठादाराच्या ऑनमार्क पोर्टलमध्ये आढळलेल्या त्रुटींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि प्रणाली मजबूत करण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ज्ञांना तैनात केले आहे, असे सीबीएसईच्या वतीने सांगण्यात आले.

सीबीएसईने रविवारी ‘एक्स’ या समाज माध्यमावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले. विविध सरकारी संस्था आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) सायबर सुरक्षा व्यावसायिकांचा समावेश असलेले तज्ज्ञांचे पथक गेल्या काही दिवसांपासून हे प्लॅटफॉर्म सुरक्षित करण्यासाठी काम करत आहे.  त्रुटींवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे आणि प्रणालीमध्ये इतर कोणतीही संभाव्य त्रुटी शिल्लक राहणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सीबीएसईने निवेदनात म्हटले आहे.

संभाव्य सुरक्षा समस्या निदर्शनास आणून देणार्‍या दक्ष नागरिकांचे मंडळाने आभार मानले. मंडळाने त्यांच्यापैकी काहींशी थेट संवाद साधला होता. निकालानंतरच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या आणि तपासलेल्या उत्तरपत्रिकांमधील विसंगतीच्या वृत्तांमुळे सीबीएसईवर दबाव वाढत असतानाच हे घडले आहे. सीबीएसईच्या सेवा पुरवठादाराद्वारे वापरल्या जाणार्‍या पोर्टलमधील कथित त्रुटींबाबत सार्वजनिक स्तरावर व्यक्त होत असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन आले आहे.

इयत्ता १२वीच्या वेदांत या विद्याथ्र्याने अलीकडेच ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये आरोप केला होता की, पुनर्मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत सीबीएसईने अपलोड केलेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका त्याची नव्हती. ही पोस्ट व्हायरल झाली, ज्यानंतर इतर अनेक विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमावर असेच दावे केले. त्यानंतर या त्रुटी सीबीएसईच्या लक्षात आल्या.

राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

गुणपद्धतीच्या गोंधळाबाबत रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी या गोंधळाबाबत सीबीएसई प्रशासन आणि केंद्रातील मोदी सरकारला काही प्रश्न विचारल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र या प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी ‘तुम्ही पाकिस्तानी, अतिरेकी, एजंट आहात का,’ अशा अपमानास्पद प्रतिक्रिया ऐकाव्या लागल्याचा अनुभव त्यांनी राहुल गांधी यांना सांगितला.