नवी दिल्ली : ‘सीबीएसई’ परीक्षेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यादरम्यान गुरुवारी वाद झाला. राहुल गांधी वैफल्यग्रस्त असून ते ‘सीबीएसई’च्या मुद्द्याचे राजकारण करत आहेत, अशी टीका प्रधान यांनी केली. त्यावर, तुम्ही माझ्यावर कितीही हल्ले केले तरी तुमचे गुन्हे माफ होणार नाहीत, असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.
‘सीबीएसई’च्या ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (ओएसएम) प्रणालीमध्ये उत्तरपत्रिकांमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप काही विद्यार्थ्यांनी केल्यानंतर राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यांनी बुधवारी याबाबत एक ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध करून या संपूर्ण घोटाळ्याची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी आणि विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी केली. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या कंपनीला ‘सीबीएसई’चे कंत्राट का देण्यात आले, असा सवालही त्यांनी केला होता.
राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना धर्मेंद्र प्रधान यांनी निवडणुकांमधील जय-पराजयाचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी सुधारणा आणि तंत्रज्ञानात्मक प्रगतीला विरोध करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रधान यांना प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘‘कोणाच्या आदेशांवरून ‘कोएम्प्ट’ला कंत्राट देण्यात आले होते? त्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी का केली नव्हती? ‘कोएम्प्ट’चे व्यवस्थापन आणि मोदी सरकार यांच्यात काय संबंध आहे,’’ असे मुद्दे राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना उद्देशून उपस्थित केले.
राहुल गांधींचा विचार करता, त्यांची मानसिकता वेगळ्या स्थितीला पोहोचलेली दिसते. निवडणुकांमध्ये सातत्याने पराभव होत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसते. त्यांनी ‘एसआयआर’ला विरोध केला, ते ईव्हीएमला विरोध करत असत आणि त्यांनी डिजिटल इंडियाला विरोध केला. त्यांना देशाची वैज्ञानिक प्रगती झाल्याचे मान्य दिसत नाही. – धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री.
धर्मेंद्र प्रधानजी, तुम्ही माझ्यावर हवा तितका हल्ला करू शकता, पण त्यामुळे तुमच्या गुन्ह्यंमधून तुमची मुक्तता होणार नाही. तसेच मी १८.५ लाख मुलांसाठी प्रश्न विचारणेही थांबवणार नाही. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस.
