नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सध्या इयत्ता सातवी ते नववीत शिकणाऱ्या आणि त्रिभाषा धोरणांतर्गत दोन परदेशी भाषांची निवड केलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीपर्यंत त्यांची हीच जुनी भाषा रचना पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती शुक्रवारी बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

नव्या त्रिभाषा भाषा धोरणानुसार किमान दोन भारतीय भाषा शिकण्याची सक्ती ही आगामी इयत्ता सहावीपासून लागू केली जाईल आणि ती सध्याच्या सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होणार नाही, असे स्पष्ट करत बोर्ड लवकरच या संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करणार आहे.

सीबीएसईने गेल्या मे महिन्यात जाहीर केले होते की, १ जुलैपासून इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन भाषांचा अभ्यास सक्तीचा असेल, ज्यामध्ये किमान दोन मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. या निर्णयानुसार परदेशी भाषा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन भारतीय भाषांचा अभ्यास केल्यानंतरच ती तिसरी भाषा म्हणून किंवा चौथी अतिरिक्त भाषा म्हणून निवडता येणार होती. या आदेशाविरोधात अनेक विद्यार्थी आणि पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती.

द्विस्तरीय पद्धतीची अंमलबजावणी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून नवीवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयांसाठी द्विस्तरीय पद्धत सुरू केली जात आहे. या रचनेअंतर्गत गणित आणि विज्ञानाचे अनिवार्य मानक (मँडेटरी स्टँडर्ड) आणि पर्यायी प्रगत (ऑप्शनल ॲडव्हान्स्ड) असे दोन स्तर असतील. सर्व विद्यार्थी आठवीच्या गुणांच्या एका सामायिक परीक्षेस बसतील, परंतु ज्यांना उच्च नैपुण्य हवे आहे ते सखोल वैचारिक समज आणि उच्च विचार कौशल्याची चाचणी घेणारा अतिरिक्त प्रगत स्तराचा पेपर देऊ शकतात. या नवीन द्विस्तरीय पद्धतीनुसार पहिली इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा २०२६-२७ मधील नववीच्या तुकडीसाठी २०२८ मध्ये घेतली जाईल.