मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयोगात एकाधिकारशाही राबवत असून त्यांना हटवण्याची मागणी विरोधी पक्षांनी बुधवारी केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या (एसआयआर) मुद्द्यावर निवडणूक आयोगाचे सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी या अन्य दोन निवडणूक आयुक्तांनी १० महिन्यांच्या कालावधीत १४ आक्षेप नोंदवल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींनी संताप व्यक्त केला आहे. ज्ञानेश कुमार चोर, दरोडेखोर आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी ज्ञानेश कुमार यांच्याबाबत काय म्हणाल्या?

आमची इंडिया आघाडी एकसाथ आहे. भारतात मतचोरीचा महाघोटाळा झाला आहे. या महाघोटाळ्यामुळे जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राहुल गांधींनी बिहारमध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. मतचोरी करून भाजपाने हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालच्या निवडणुका जिंकल्या. बंगालमध्ये तर लूट केली. निवडणूक आयोगाकडे मी गेले होते, सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता तर सगळं समोर आलं. कारण ज्ञानेश कुमार चोर आहे, दरोडेखोर आहे, त्याने मतचोरी केली. ईव्हीएम मशीन हायजॅक केलं, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स जाळली. मतमोजणीत मोठे फेरफार केले. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी करते.

लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू-ममता बॅनर्जी

लोकशाही वाचवायची असेल आणि लोकांची सुरक्षा तसंच मतांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर लोकांनी दिलेल्या मतांचीच चोरी होत असेल तर मग संविधानाचं काय होणार? देशाला काय दिशा मिळणार? आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावा. जर ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर हे आंदोलन खूप तीव्र होईल. जमिनीपासून आकाशापर्यंत आम्ही आमचा आवाज पोहचवू.

संपूर्ण देशात १३ कोटींची मत चोरली गेली आहेत-ममता बॅनर्जी

मला एक सांगा भाजपा म्हणते आम्ही जिंकलो आहोत, मग ज्ञानेश कुमारांनी मतचोरी का केली? ज्ञानेश कुमारांनी ईव्हीएम मशीन्स मॅनेज का केली? ज्ञानेश कुमार यांनी ईव्हीएम मशीन्स का जाळली? शिवा खन्ना कोण आहे? एक सॉफ्टवेअर बनवलं आणि मतचोरी लुटली. आमच्या बंगालमध्ये भाजपाने ९२ लाख मतं लुटली. संपूर्ण देशात १३ कोटी मतं लुटली आहेत. सगळं काही निवडणूक आयोगाच्या संगनमताने झालं आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे. असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. आम्हाला देशात लोकशाही परत आणायची आहे. त्यासाठी आमचा प्राण गेला तरीही चालेल असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.