CEC Gyanesh Kumar Removal Resolution Kerala Assembly : केरळमधील काँग्रेस सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केरळ सरकार यासंदर्भात विधानसभेत ठराव मंजूर करून घेणार आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ठराव मंजूर करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
राज्याचे मुख्यमंत्री वी. डी. सतिशन यांच्यामार्फत विधासनभेत हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती विधानसभेच्या बुलेटीनमधून देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, तत्कालीन डाव्या लोकशाही आघाडी सरकारने मांडलेला एसआयआर लागू करण्याविरोधातील ठराव राज्य विधानसभेने मंजूर केला होता. केरळमध्ये १६ व्या विधानसभेचे दुसरे अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे.
आणखी तीन प्रस्तावही मांडणार
केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करण्याव्यतिरिक्त, विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या या प्रस्तावात आणखी एक महत्त्वाची मागणी केली जाईल. त्यानुसार, विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेतील त्रुटी दूर करून, मतदार यादीतून नाव वगळण्यात आलेल्या सर्व पात्र मतदारांचे मतदानाचे हक्क पुन्हा बहाल करण्यात यावेत, अशी मागणी केली जाईल. तिसरी मागणी अशी असेल की, निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीची पुनर्रचना करण्यात यावी. या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांचा समावेश केला जावा.
केरळमधील पक्षीय बलाबल कसं आहे?
१४० सदस्यांच्या या विधानसभेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडे १०२ सदस्य आहेत, तर सीपीआय(एम) च्या नेतृत्वाखालील एलडीएपकडे ३५ आमदार आहेत. तसेच भाजपाकडे तीन आमदार आहेत. काँग्रेस आणि सीपीआय(एम) हे दोन्ही पक्ष केंद्रीय निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी सुरू असलेल्या राष्ट्रीय मोहिमेत आणि आंदोलनात सामील असल्याने, हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर होण्याची पूर्ण शक्यता आहे. यापूर्वीही अनेक प्रसंगी केरळ विधानसभेने सीपीआय(एम) आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने एकमताने प्रस्ताव मंजूर केले आहेत.
प्रस्तावात नेमकं काय?
या प्रस्तावात म्हटले आहे की, निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर शंका उपस्थित केल्या जात असल्याने, आयोगाची विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचे पाऊल उचलणे अपरिहार्य आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे की, “तांत्रिक फेरफार आणि अनियमितेच्या माध्यमातून अल्पसंख्याक, स्थलांतरित, वंचित घटक आणि तरुणांचे मतदानाचे हक्क हिरावून घेणे हे लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन आहे.”
