मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर विरोधकांचा दबाव वाढत चालला आहे. १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या देशभरातल्या तरुण आणि ‘जेन झी’च्या आंदोलनापूर्वी कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. “ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत देशातील तरुण मागे हटणार नाहीत,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘हे आंदोलन देशामधल्या तरुणांचे आणि जेन झीचे’
वृत्तसंस्था ‘एएनआय’शी बोलताना सौरव दास म्हणाले, “१० ऑक्टोबरपासून देशातील तरुणांची अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळणार आहे. या आंदोलनाची हाक कॉक्रोच जनता पार्टीने दिली असली, तरीही हे आंदोलन प्रत्यक्ष देशातल्या तरुणांचे आणि जेन झीचे आहे. आपला परिस्थितीमधील बदल आणि व्यवस्थेतील सुधारणा केवळ मतदानाच्या अधिकारानेच होऊ शकते, हे या पिढीला उत्तम प्रकारे ठाऊक आहे.”
निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरकारभारावर बोट ठेवताना त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. “सध्याची व्यवस्था अशी झाली आहे की, जेव्हा तुम्ही मतदानासाठी जाता, तेव्हा मतदार यादीतून तुमचे नावच गायब असल्याचे समोर येते. जर सत्ताधाऱ्यांनी अशी व्यवस्था निर्माण केली असेल, तर देशातील तरुणांनी दाद कोणाकडे मागायची? बेरोजगारीची भीषण समस्या कशी सुटणार?” असा सवाल त्यांनी केला.
राहुल गांधींचे गंभीर आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर बेकायदेशीरपणे आणि एकतर्फी निर्णय घेत ‘फॉर्म ६’मध्ये बदल केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवेपर्यंत देशभरात आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हा वाद आणखी विकोपाला गेला आहे. नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘फॉर्म ६’च्या कोणत्याही बदललेल्या स्वरूपाला मंजुरी दिलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आरोपांवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
दुसरीकडे, निवडणूक आयोगाने राहुल गांधी आणि विरोधकांचे हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे सांगत आयोगाने स्पष्ट केले की, “बिहारमध्ये २४ जून २०२५ रोजी लागू करण्यात आलेला ‘एसआयआर’चा (SIR) आदेश पूर्ण आयोगाच्या एकमुखाने घेतलेल्या निर्णयानुसार जारी करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानेही २७ मे २०२६ च्या आपल्या निकालात या आदेशाची वैधता कायम ठेवली आहे.”
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आणि १० ऑक्टोबरचा आंदोलनाचा इशारा यामुळे आगामी काळात निवडणूक आयोग विरुद्ध विरोधक हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
